प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

0
99

सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारे दिग्दर्शन आणि प्रभावी पण, संयत अभिनयामुळे भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे काल सोमवारी बेंगळुरूत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड आजारपणाशी झुंज देत होते. बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी काल सकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी सरस्वती, मुलगा रघु आणि पत्रकार, लेखिका कन्या राधा असा परिवार आहे. कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

बहुपेडी व्यक्तिमत्त्व
बहुभाषिक व बहुपेडी व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयाने रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटके सुजाण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ययाती, हयवदन व नागमंडल ही त्यांची नाटके प्रचंड गाजली. १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या ‘तुघलक’ या नाटकाने इतिहास घडवला. या नाटकामुळे त्यांचे नाव देशभरात गेले. साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल १९९८ साली त्यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

चळवळ्या कार्यकर्ता
अफाट वाचन, चिंतन आणि प्रयोगशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली. वयाची पंच्च्याहत्तरी पार केल्यानंतरही ते कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. आपली मते ठामपणे मांडत होते. गिरीश कर्नाड यांनी त्यांची मते वा भूमिका कधीच लपवल्या नाहीत. देशातील वाढती असहिष्णुता व साहित्यिक, पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांविरोधात त्यांनी नीडरपणे आवाज उठवला. देशातील पुरोगामी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते.