प्रयत्ने वाळूचे…

0
65
  • ऍड. अशोक मोये

मनुष्यधर्म असा आहे की आपल्या हातून काही चांगले घडले तर ते मी केले असे तो म्हणतो. वास्तविक तसे पाहता जे घडले ते नक्कीच त्याच्या .. प्रयत्नाने, नशिबाने व दैवाची साथ असल्यामुळे घडले हे तो विसरून जात नाही का?

सफल, सुखद व समाधानी असे जीवन जगण्यास मानवाला नशिबाची व दैवाची साथ नक्कीच असावी लागते हे आपल्याला अनेक ठिकाणी व काही विशिष्ट अशी घटना घडल्यास कित्येकांच्या तोंडून ऐकावयास मिळते व ते एक सत्य आहे असे बहुतेकांना वाटते.

असेही म्हणतात की नशिबाची जोड मिळाल्यास व वेळ बरी असली म्हणजे तुफानातील लाटासुद्धा पैलतीरास जावयास वाटा करून देतात, तसंच पाणी बुडवत नाही, अग्नी जाळीत नाही. इतकेच नव्हे तर विषाचे अमृत होते. नशीब व वेळ रावाचा रंक तर रंंंंंकाचा रावही करून सोडतात याची प्रचिती आपल्याला जीवनातील घडामोडींच्या आधारावर येते.

हे जरी कित्येकांचे ठाम मत असले तरीपण मनुष्याने नशिबाधीन होऊन स्वस्थ पडून रहावे किंवा नशिबाधीन होऊन कुठलीही परीक्रमा करू नये असंही नसतं. जर आपण प्रत्येक गोष्टीत नशीब नशीब म्हणत राहिलो तर माणूस बिलकुलच प्रगती करू शकणार नाही.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे काही लोक या वर नमूद केलेल्या मताशी बिलकुल असहमत असल्याचे आपल्याला आढळून येते. इतकेच नाही तर त्यांना नशीब, वेळ, दैव हे शब्द ऐकावयासही तिरस्कार वाटतो. त्यांच्या मते जीवन सफल होण्यास फक्त प्रयत्नांचीच गरज असते.

वास्तविक असंही वाचायला मिळते की दैव श्रेष्ठ की उद्योग श्रेष्ठ… हा वाद जगाच्या सुरुवातीपासूनच सुरू झाला आहे व तो तसाच चालू राहणार आहे.
काही पुराणातील गोष्टी या विषयावरच आधारित आहेत व त्या वाचल्यास या विषयावर प्रकाश पडतो. धर्मराजाने याच विषयावर पितामह भीष्म यांना प्रश्‍न केला. त्यावेळी भीष्मांनी त्यास वशिष्ठांची कथा सांगितली. भीष्म म्हणाले, ‘धर्मा. एकदा वसिष्ठाने ब्रह्मदेवास असाच प्रश्‍न केला होता तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ‘दैव व पुरूषार्थ (उद्योग) ही दोही समान आहेत. ज्याप्रमाणे शेतकरी शेत चांगले नांगरून आत बी पेरील तरच पीक येईल व बीजच नसले तर नुसत्या नांगरलेल्या शेताचा काहीच उपयोग नाही. त्याचप्रमाणे ‘दैवा’शिवाय प्रयत्नही निष्फळ आहेत. यासाठी पुरुषाने सतत उद्योग करीत राहावे. शिवाय दैव ज्याला म्हणतात ते तरी पूर्वीचे शुभाशुभ कर्मच होय व तेही उद्योगाचेच फळ होय. ज्याप्रमाणे गायींच्या कळपात वासरू आपल्या आईला नेमके शोधून काढते, त्याप्रमाणे त्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते.
हाच प्रश्‍न अर्जुनाने कुरूक्षेत्रात श्रीकृष्णास केला तेव्हा ते म्हणाले, ‘पार्था, दैवापेक्षा उद्योगच श्रेष्ठ आहे. उद्योगाने साध्य होत नाही अशी कोणतीही वस्तू या जगात नाही. प्रयत्न केल्यास मनुष्य इंद्रपदावरही बसू शकतो. इतकेच नव्हे तर जिवाशिवालाही पाहू शकतो.

तरीही असा प्रश्‍न उपस्थित होतो की यत्नाने साध्य होत नाही अशी कोणतीही वस्तू या जगात नाही हे जर खरे, तर फुष्कळदा अविश्रांत श्रम करूनही इच्छित फळ प्राप्त होत नाही ते कसे?- या प्रश्‍नाचे उत्तर देणे फारच कठीण आहे. कारण मनुष्य कितीही श्रेष्ठ असला तरीपण मनुष्याचे ज्ञान फारच अल्प आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक गूढाचे त्याला आकलन होत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘‘देअर आर् मेनी थिंग्ज ऑन द अर्थ व्हिच द फिलॉसॉफी हॅज नॉट ड्रीम्प्ट’’- जगातील पुष्कळ वस्तू जर अद्याप तत्त्वज्ञानालाच उमजलेल्या नाहीत तर तेथे मनुष्याची काय कथा?
वरील दाखले दैवावर व वेळेवर आधारित व पुराणातील असले तरीपण काही ताज्या घटनांची उदाहरणे घेतल्यास व त्यावर विचार केल्यास नक्कीच नशीब. दैव व वेळ यांची साथ असली तरच मनुष्य सफल, सुखद, इच्छित व समाधानी जीवन जगू शकतो हा निष्कर्ष काढता येतो. तसेच त्याच्याच प्रयत्नांची फळे त्याला त्याच्याच जीवनात चाखायला मिळतात.

अमेरिकेचे नील आर्मस्ट्रांग आपली जगातील पहिली चंद्रयात्रा सफल करून आपल्या यानात पृथ्वीवर सुखरूप परतले व जगाच्या इतिहासात चंद्रावर उतरणारे पहिले मानव म्हणून जगप्रसिद्ध झाले. या यात्रेत त्यांच्या यानाने चांगलीच कामगिरी बजावली तर कल्पना चावला व तिचे साथी अवकाशयानातून अमोल अशी माहिती गोळा करून पृथ्वीवर परत येताना (त्यांच्या चुकीमुळे नव्हे) तर कित्येक अब्ज रुपयांच्या यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे यानासकट नष्ट झाले. वास्तविक यात त्या अवकाश वीरांचा काहीच दोष नव्हता. ते सर्वजण चांगले प्रशिक्षित होते. यात आपण कोणाला दोष देणार? नशिबालाच ना?
काही वर्षांपूर्वी भारतातील एका सार्वत्रिक निवडणुकीत श्रीमती सोनिया गांधी यांच्या आटोकाट प्रयत्नाने कॉंग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळाले हे सत्य आहे. जरीही त्यांची एकमताने लीडर ऑफ पार्ल्यमेंट व भारताच्या भावी पंतप्रधान म्हणून निवड केली तरीदेखील (आम्ही हे दृश्य टीव्हीवर पाहिले) अखेर अचानक प्रधानमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याऐवजी श्री. मनमोहन सिंग यांच्या गळ्यात खेचून आल्यासारखी पडली व ते भारताचे पंतप्रधान झाले. मग यामागील कारणे कोणतीही असोत. तर ते श्री. मनमोहन सिंग यांच्या नशिबानेच घडले.

काही वर्षांपूर्वी एका भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात सचीन तेंडुलकर द्विशतक गाठायला केवळ एक धाव बाकी असतानाच भारताचे कॅप्टन गांगुलीने डाव घोषित केला व त्याची तो उच्चांक गाठण्याची संधीच हुकली (मग त्यामागील कारण काहीही असो) हे तेंडुलकरचे नशीब नव्हे काय?
मुंबईतील एक प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. नितू मांडके यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन एक प्रचंड असे करोडो रुपयांचे हॉस्पिटल काढले परंतु दुर्दैवाने मध्येच अचानक त्यांचे निधन झाल्याने तो प्रकल्प पूर्णत्वास आणू शकले नाहीत हे त्यांचे नशीब नव्हे काय?
काही अप्रत्यक्ष उदाहरणे घेतल्यासही आपल्याला हेच आढळून येते व आपण नशिबावर जास्त भर देतो पण ती चूक आहे का?
दोन सख्ख्या बहिणी. एक मोठी व दुसरी लहान- दोघींमध्ये दोन वर्षांचे अंतर. मोठी बहीण दिसायला जेमतेम, सावळी, नॉनमॅट्रीक. दुसरी छोटी दिसायला एकदमच सुंदर, गोरीपान, एकदमच हुशार, पोस्ट ग्रॅज्युएट. – तर मोठ्या बहिणीला जबरदस्त स्थळ आलं- सुंदर गोरापान, श्रीमंत, उद्योगपती नवरा तर दुसरीला एक मध्यमवर्गीय स्थळ – ग्रॅज्युएट, काळसर व कारकून म्हणून एका आस्थापनात काम करणारा नवरा मिळतो. हे उदाहरण घेतल्यास हा नशिबाचाच भाग असे म्हणता येणार नाही काय?
एक श्रीमंत माणूस प्रकृती अस्वास्थ्याने, खाण्यापिण्याची बंधने असल्यामुळे खिन्न असतो तर त्याचाच शिपाई त्याच्याच बंगल्यावर यथेच्छ खाऊन पिऊन सुखासमाधानाने व मजेत आपले जीवन जगतो. वास्तविक वरील उदाहरणे या वादावर नक्कीच प्रकाशझोत टाकतात की सुफळ, सुखद व समाधानी असे ऐच्छिक जीवन जगण्यास माणसाला नशिबाची व दैवाची साथ नक्कीच लागते.
माणूस केवढाही हुशार, कर्तृत्ववान असला तरी तो आपण हे नक्कीच करणार, ते नक्कीच करणार असे नक्कीच म्हणू शकत नाही. मनुष्यधर्म असा आहे की आपल्या हातून काही चांगले घडले तर ते मी केले असे तो म्हणतो. वास्तविक तसे पाहता जे घडले ते नक्कीच त्याच्या .. प्रयत्नाने, नशिबाने व दैवाची साथ असल्यामुळे घडले हे तो विसरून जात नाही का?