अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय अत्यंत कठीण ठरतो त्यामुळे अन्य सर्व विषयांमध्ये गुणवत्ता मिळविणार्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण जाते. त्यामुळे गळतीचे प्रमाणही वाढल्याचे आढळून आले आहे. त्यावर उपाय म्हणून गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यालयामध्ये गणिताची प्रयोगशाळा स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन तसा आदेशही जारी करण्यात आला आहे.
येत्या २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात गणितसंबंधीच्या साहित्याचा योग्य पध्दतीने वापर करून विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची आवड निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न असेल. त्यासाठी खास साहित्य सामुग्री तयार करण्यात आल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
या साहित्य सामुग्रीच्या माध्यमातून संख्या व भूमिती शास्त्राच्या आकृत्या प्रायोगिक पध्दतीने शिकविणे शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला अधिक वाव मिळावा यासाठी प्रत्येक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्याचेही विद्यालयाना मंडळाने पाठविलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून मंडळाने सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.
वरील उपक्रमासाठी प्रत्येक विद्यालयात विद्यार्थ्यांना चित्रकला पेपर, सूत आरसा, चित्रकला बोर्ड, एलसीडी प्रॉजेक्टर, लॅपटॅप कॅल्क्युलेटर आदी साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.