राजधानी पणजी शहरात भव्य स्वरुपाचे वाहतूक भवन उभारण्याचे सरकारने ठरविले असून त्याचे काम जलदगतीने सुरू व्हावे यासाठी सल्लागार म्हणून प्रसिद्ध वास्तूशिल्पकार राहूल देशपांडे यांची नियुक्ती केल्याची माहिती वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
फोंडा शहरात वाहतूक हब उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. माशेल येथील बाजार व बसस्थानक उभारण्याची प्रक्रिया पंधरा दिवसांत सुरू होईल. सरकारने कदंब महामंडळासाठी ११ कोटी रुपये दिले आहेत.
दि. ३१ मार्चपर्यंत उच्च सुरक्षा क्रमांक पट्ट्यांसाठी निविदा जारी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाहतूक खात्याच्या सर्व कार्यालयामध्ये ई-गव्हर्नन्स पूर्ण केले जाणार असून ते पूर्ण झाल्यानंतर वाहतूक परवाने किंवा वाहन नोंदणीसाठी संबंधितांना रांगेत राहावे लागणार नाही, असे ढवळीकर यांनी सांगितले.