प्रतिभावंत कलाकारांमुळे सिनेसृष्टी जिवंत : मुकेश छाब्रा

0
176

 

प्रतिभावंत कलाकारांना मरण नाही. अशा कलाकारांमुळेच सिनेसृष्टी जिवंत राहाणार आहे. आपल्याकडील कलाकारांमध्ये प्रतिभेची वानवा नाही. परंतु ती कशी सादर करणे याकडेही बघावं लागतं, असे मत कास्टींग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी स्किल स्टुडिओ कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले.
इफ्फीचाच भाग असलेल्या या कार्यक्रमात रविवारी मुकेश छाब्रा यांनी कास्टींग डायरेक्टरची चित्रपटातील भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. भूमिकेप्रमाणे चित्रपटातील कलाकारांची योग्य निवड करणे हे कास्टींग डायरेक्टरचे काम असते ते कसे करायचे याविषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच आपल्या कामाचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला.

दंगल, गँगस् ऑफ वसेपूर, हैदर, भूतनाथ रीटन्स्, हायवे, रॉकस्टार, शाहीद सारख्या चित्रपटांचे कास्टींग करणारे मुकेश छाब्रा म्हणाले की, आपण चित्रपटांसाठी लाखो तरूणांची ऑडिशन्स् घेतो. ज्यावेळी त्यातील कलाकारांची निवड होत नाही तेव्हा मला फार वाईट वाटते. परंतु दिग्दर्शकाला भूमिकेसाठी पाहिजे अशा कलाकाराची निवड करायची असते. माझ्याकडे येणार्‍या कलाकारांची त्यांची प्रतिभा पाहून त्यांची यादी आपण तयार करतो. पुढे कधी जरूरी पडल्यास अशा कलाकारांना संधी देता येते.

पुढे बोलताना मुकेश छाब्रा म्हणाले की, कलाकाराची प्रतिभाच सर्व काही आहे. आपल्याला काम करायचे आहे तर मग आपल्यातील प्रतिभेला जिवंत ठेवा. मुंबईत चित्रपटात काम करायला येणार्‍या कलाकारांना ते म्हणतात, प्रादेशिक भाषेतील कलाकारांनाही फार महत्व आहे. तेव्हा उगीचच मुंबईकडे खस्ता खायला येऊ नका. आपण आपल्या प्रांतात शिका, परिपूर्ण होऊन मगच मुंबईत आपले नशीब अजमवायला या. आपल्याकडे प्रतिभा असेल तर मग कसलीच भीती नाही. आपल्याला काम नक्कीच मिळू शकेल, असे पुढे छाब्रा म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी काही कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला. रीचा चड्डा, राधिका आपटे, भूमी पेडणेकर, ह्यूमा कुरेशी या अभिनेत्रींनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर वेगळी अशी छाप सिनेसृष्टीत निर्माण केली आहे. तेव्हा अशा कलाकारांची मेहनत नजरेसमोर ठेवून कलाकारांनी काम केले पाहिजे असे पुढे छाब्रा म्हणाले. चित्रपट निवडीविषयी बोलताना ते म्हणाले, आपण आपल्या कामाप्रती एकनिष्ठ आहे. त्यामुळे आपण त्याकडे प्रामाणिक असतो. मोठे चित्रपट, छोटे चित्रपट अशी आपण तुलना करत नाही. अनुराग कश्यप यांच्याकडून आपण खूप काही शिकलो आहे. कलाकारांची निवड ही भूमिकेला साजेल अशा कलाकारांची करायची असते, हे त्यांच्याकडून आपण शिकलो. त्यामुळेच आपण आपली वेगळी अशी स्वत:ची कास्टींग कंपनी उभी करू शकलो, आपल्याकडे जेव्हा खूप कलाकारांचा सिनेमा येतो तेव्हा आपल्याला सर्वात जास्त आनंद होतो. कारण अधिकाधिक कलाकारांना आपण काम देऊ शकतो. अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत युद्ध या सोनी टीव्हीवरील गाजलेल्या मालिकेसाठी आपण काम केले तेव्हा त्यात जास्तीत जास्त कलाकारांना संधी दिली. असे छाब्रा म्हणाले. मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी छाब्रा यांना स्मृतिचिन्ह दिले.