माहितीपटांना प्रोत्साहन देण्यास सरकारचे प्रयत्न

0
79
The Director, Mumbai International Film Festival, Shri Manish Desai, at a Press Conference, during the 48th International Film Festival of India (IFFI-2017), in Panaji, Goa on November 26, 2017.

>> खुला मंच चर्चासत्रात मनीष देसाईंचे मत

माहितीपटांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून माहितीपट चळवळीला सरकारचा पाठिंबा असल्याचे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी फिल्म्स डिव्हिजन आयडीपीए अर्थात भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या सहकार्याने प्रयत्न करत असल्याचे मनीष देसाई म्हणाले. इफ्फी २०१७मध्ये आज सोशल मीडियाच्या जंजाळात माहितीपट ज्ञानाचा एकमेव खराखुरा स्रोत आहे का या विषयावर खुला मंच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनीष देसाई, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक दीप जॉय मांपिल्ली, जेष्ठ पत्रकार सिराज सय्यद आणि पत्रकार प्राची पिंगळे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. गोमंतक टाइम्सचे संपादक शाश्वत गुप्ता रे यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
सोशल मीडियावरील मजकुरांवर नियंत्रण असावे की नसावे याबाबत या चर्चासत्रात वक्त्यांंकडून संमिश्र प्रतिक्रिया उपलब्ध झाली.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्वरूप बघता यावर नियंत्रण राखणे कठीण असल्याचे मत फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनीष देसाई यांनी व्यक्त केले. पत्रकार प्राची पिंगळे यांनीही देसाई यांच्या मताला दुजोरा दिला. सरकारतर्फे वृत्तपत्र, चित्रपट यावरील मजकुरासंदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे. मात्र सोशल मीडियावरील नियंत्रणासंदर्भात अद्याप कुठलीही यंत्रणा नसल्याचे ते म्हणाले. ग्राहक वर्गानेच उपलब्ध मजकुराची विश्वासाहर्ता पडताळून पाहावी असे त्यांनी सांगितले. तर जेष्ठ पत्रकार सिराज सय्यद यांनी जागतिक पातळीवरील संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडियावर नियंत्रण राखता येऊ शकते असे मत व्यक्त केले.

सोशल मीडियावरील मजकुराच्या विश्वासार्हता आणि जबाबदारीच्या अनुषंगाने भविष्यात लोकांनीच उपलब्ध पोस्ट, त्याचा हेतू, आणि परिणाम याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत प्राची पिंगळे यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावरील मजकुराची विश्वासार्हता आणि जबाबदारी या दृष्टिकोनातून जनजागृती करणे गरजेचे आहे असे मनीष देसाई यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सीबीएसईच्या अभ्यासक्रमात प्रसारमाध्यमांसंदर्भातील विषयाचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. विविध राज्य सरकारच्या वतीने देखील असा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. माहितीपटांची केवळ निर्मिती होऊन चालणार नाही तर ते प्रदर्शित करण्यासाठी अधिकाधिक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणं गरजेचं आहे असे मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.

माहितीपटासाठी निधी उपलब्ध करणे, माहितीपटांसाठी दूरदर्शन वाहिनीवर स्वतंत्र स्लॉट उपलब्ध करणे, माहितीपटासाठी फेलोशिप सुरु करणे तसेच माहितीपटाच्या प्रदर्शनासाठी नवनवीन व्यासपीठांची निर्मिती करणे अशा प्रयत्नांचा यात समावेश आहे असे त्यांनी नमूद केले.
सोशल मीडिया माध्यमात काम करताना उत्तम सादरीकरणासाठी चढाओढ सुरु असली तरी सरकारकडून या माध्यमाचा वापर करताना मजकुराबाबत तडजोड केली जात नाही असे मत दीप जॉय मांपिल्ली यांनी व्यक्त केले.