जटामुकुटमंडित राम

0
12
  • प्रा. रमेश सप्रे

संपूर्ण वनवासात राजमुकुट न घालता हा जटाजूट मुकुट धारण करून राम-लक्ष्मण सहजपणे एका ऋषीच्या आश्रमातून दुसऱ्या ऋषीच्या आश्रमात जात होते. एरव्हीच्या त्यांच्या राजस रूपाला यामुळे सात्त्विकतेचे वलय प्राप्त झाले होते.

निषादराज गुहक, त्याची राजधानी शृंगवेरपूर, त्याची रामभक्ती, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राम-सीता-लक्ष्मण यांचा त्याच्याकडे एका रात्रीचा झालेला निवास नि राम-गुहक यांच्यातील परस्पर संबंध-संवाद आणि या साऱ्या प्रसंगात दडलेले अनेकविध संस्कार यावर थोडे सहचिंतन करू.
साक्षात श्रीराम आपल्या राजधानीत आश्रयाला आलाय ही वस्तुस्थिती वाटली तरी प्रत्यक्ष गृहकाची नि शृंगवेरपूरवासीयांची भावना तशी नव्हती. ते सारे श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. सर्व रामशरण होते.

सर्वप्रथम रामाला वल्कलात बघून गुहकाला आश्चर्य वाटले. कारण अयोध्येत होऊ घातलेल्या रामाच्या यौवराज्याभिषेकाची त्याला कल्पना होती. पण नंतर साऱ्या परिस्थितीने घेतलेल्या नाट्यमय वळणाची त्याला बिल्कुल कल्पना नव्हती. प्रथम त्याला वाटले की सीता-राम-लक्ष्मण हे कोणत्यातरी व्रताच्या आचरणासाठी वनात आले आहेत.

हर्षभरित होऊन गुहकाने श्रीराम-सीता-लक्ष्मण यांना साष्टांग नमस्कार केला. सायंकाळची वेळ असल्याने त्यांनी सर्वांच्या भोजनासाठी फळे-कंदमुळे यांची व्यवस्था केली. अयोध्येत घडलेला प्रसंग रामाकडून थोडक्यात समजून घेतल्यावर गुहकाने स्वतः श्रीराम-सीतेसाठी तृणशय्या (गवताचा बिछाना) तयार केली. त्याच्यावर पडल्या पडल्या दिवसभराच्या श्रमांमुळे, चालण्यातील कष्टांमुळे सीता-राम दोघांनाही लगेच शांत झोप लागली. आपण झोपताना रामस्मरण करत मनाच्या पडद्यावर रामाचे दर्शन घेत जो श्लोक म्हणतो तो रामाने जगून साकार केला. एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखा दिसत होता राम!
श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा। ध्यातो तुझी राजस योग मुद्रा॥
नेत्री न येरे तुजवीण निद्रा। कै (केव्हा) भेटसी बा मजला सुभद्रा॥
लक्ष्मणाला मात्र झोप येत नव्हती. पुढची चौदा वर्षे त्याला झोप येणार नव्हती. विश्वामित्रांनी शिकवलेल्या बला नि अतिबला या विद्या आत्मसात केल्यामुळे आता लक्ष्मण चौदा वर्षे निर्निद्रा अन्‌‍ निराहार (म्हणजे झोप व आहार न घेता) राहणार होता. यासंदर्भात जिच्यावर मोठा अन्याय झाल्यासारखा वाटतो त्या लक्ष्मणपत्नी उर्मिलेला न्याय देणारा एक प्रसंग आख्यायिकांमध्ये सांगितला जातो. तो मोठा गमतीदार आहे. म्हणजे लक्ष्मणाला चौदा वर्षे निरंतर जागे राहावे लागणार असल्याने त्याची झोप उर्मिलेने घेतली नि ती अयोध्येतल्या राजप्रसादात चौदा वर्षे निद्रावस्थेत राहिली. या कथेतून पतीपत्नी संबंधातून व्यक्त होणारे भावबंध किती उत्कट नि हृद्य असू शकतात याची जाणीव होते. असो.

ती संपूर्ण रात्र गुहक नि लक्ष्मण यांनी रामाच्या जीवनातील अनेकानेक घटना-प्रसंगांच्या स्मृती जाग्या करण्यात घालवली. धन्य ते दोघे रामभक्त!
दुसऱ्या दिवशी सीता-राम यांची सेवा करताना गुहकाचे अष्टसात्त्विक भाव जागे झाले. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना खंड नव्हता. अखंड आनंदाचा अनुभव घेताना गुहकाने एक विशेष काम केले. वडाच्या झाडाचा चीक (दीख) आणून तो त्यानं राम, लक्ष्मण या दोघांच्याही केसांना लावून त्यांचा जटाजूट तयार केला. संपूर्ण वनवासात राजमुकुट न घालता हा जटाजूट मुकुट धारण करून राम-लक्ष्मण सहजपणे एका ऋषीच्या आश्रमातून दुसऱ्या ऋषीच्या आश्रमात जात होते. एरव्हीच्या त्यांच्या राजस रूपाला यामुळे सात्त्विकतेचे वलय प्राप्त झाले होते.

येथे एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे. सर्वांच्या नित्यपठणात असलेल्या रामरक्षा स्तोत्रात रामाचे दोन ध्यानमंत्र आलेले आहेत. त्यातील जटाजुटाचा उल्लेख आपल्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो एक मौलिक संस्कार आहे.
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम्‌‍।
पीतं वासो वसानं नवकमल दलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌‍।
वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचंद्रम्‌‍॥
या ध्यानमंत्रात रामाच्या प्रसन्न ‘राजाराम’ रूपाचे वर्णन आहे. रामाने अलंकार, रेशमी पीतांबर धारण केलाय, तो बद्धपद्मासनात बसला आहे. बरोबर सीताही आहे. पण या साऱ्या राजवैभवात एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे, ती म्हणजे, रामाने सुवर्णराजमुकुट धारण न करता ‘जटाजूट’ (मुकुट) धारण केला आहे.

तसेच पुढे म्हटलेय (म्हणजे आपण ध्यान देऊन म्हटले पाहिजे)-
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌‍।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌‍॥
येथेही रामाचे ध्यान ‘जटामुकुटधारी’ या रूपातच करायला सुचवलंय. कारण केव्हाही राज्यपदाचा त्याग करून, तपास व्रताचा स्वीकार करून वनात जावं लागेल. यालाच समर्थ रामदास म्हणतात- ‘श्रीमान योगी.’ शिवाजी महाराज याच वृत्तीचे होते. असो.
हा वल्कलधारी, जटाजूट धारण केलेला राम (आणि लक्ष्मणही) पुढे तपराव्रत स्वीकारतो. या व्रताचे एक लक्षण ‘अहिंसा पालन’ हे असते. मग राम (लक्ष्मण) धनुष्यबाण जवळ का बाळगतो? यावरून झालेला सीता-राम यांच्यातील संवाद उद्बोधक आहे. तो जसा सीतेची स्त्रीसुलभ (पत्नीला योग्य) अशी वृत्ती दाखवणारा आहे, तसाच रामाचं क्षत्रीय ब्रीद (राजा म्हणून कर्तव्य) दाखवणाराही आहे. अशा प्रसंगांमुळेच वाल्मीकींचे रामायण नात्यातील भावबंध दाखवणारा, त्याचवेळी आपल्या कर्तव्यांची, मर्यादांची आठवण करून देणारा ग्रंथ आहे. अन्‌‍ म्हणूनच तो सर्वांच्या हृदयात विराजमान झाला आहे.