प्रतिकाराविना जिंकले कुमारस्वामी

0
178
Bengaluru: Karnataka Chief Minister H D Kumaraswamy with his deputy G Parameshwara and other JD(S) and Congress leaders waves to the media after his coalition government won the trust vote by voice vote, at Vidhana Soudha in Bengaluru, on Friday. (PTI Photo/Shailendra Bhojak) (PTI5_25_2018_000108B)

>> विश्‍वासदर्शक ठरावाआधीच भाजपचा सभात्याग

अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काल विधानसभेत विरोधी भाजपच्या कोणत्याही प्रतिकाराविना बहुमत सिध्द केले. आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपने विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच सभात्याग केला. त्याआधी सभापती निवड प्रक्रियेतूनही याच कारणावरून माघार घेतल्याने कॉंग्रेसचे रमेशकुमार यांची सभापतीपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.
या पदासाठी भाजपचे सुरेश कुमार हे उमेदवार होते. विद्यमान कर्नाटक विधानसभेत भाजपचे सर्वाधिक उमेदवार असले तरी कॉंग्रेस व जेडीएस यांचे एकत्रित संख्याबळ अन्य दोन आमदारांसह ११७ असे आहे.

सभापतीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी रमेशकुमार यांचे नाव सुचवले व त्याला उपमुख्यमंत्री परमेश्‍वर यांनी अनुमोदन दिले. भाजपचा सभात्याग म्हणजे पळपुटेपणा ठरल्याची टीका कुमारस्वामी यांनी केली.
विरोधी नेते बी. एस्. येडीयुरप्पा यांनी शपथविधीनंतर बोलताना कॉंग्रेस-जेडीएस युतीवर टीकेची झोड उठविताना ही अभद्र युती असल्याची टिप्पणी केली. मात्र मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपले सरकार जनहितासाठी काम करेल असे प्रतिपादन सभागृहात केले. त्याआधी विश्‍वासदर्शक ठराव मांडल्यानंतर भाजप सदस्यांच्या अनुपस्थितीत सभापती रमेशकुमार यांनी आवाजी मतदानाने ठराव संमत झाल्याचे जाहीर केले.