स्मार्ट सिटीखाली पणजीत बसविणार ४५० ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे

0
231

स्मार्ट सिटी योजनेखाली पणजी शहरात ४५० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून १५ जूनपासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सिध्दार्थ कुंकळ्येकर व या योजनेचे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदीप पाल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली पणजीपासून दोनापावलापर्यंत हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ७ ते ८ महिन्यात संबंधित कंपनीला हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निविदा पाठवलेल्या कंपन्यापैकी चार कंपन्यांना प्रायोगिक तत्त्वावर कॅमेरे बसवून त्यांची सेवा कशी असेल याची प्रत्यक्ष माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘बीएस्‌एन्‌एल’, ‘एल ऍण्ड टी’, ‘एनईसी’ व ‘हनी व्हॅल’ ह्या त्या चार कंपन्या आहेत. या चारही कंपन्यांनी १८ जून मार्गावर ठिकठिकाणी आपले कॅमेरे बसवले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वरील ४ कंपन्यांमधून शेवटी एका सर्वोत्कृष्ट कंपनीची सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निवड करण्यात येईल. ५ वर्षांच्या काळापर्यंत ह्या कॅमेर्‍यांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीवर असेल. कंपनीचा एक नियंत्रण कक्ष पणजी शहरात असेल व त्यांचे २० अधिकारी ह्या नियंत्रण कक्षाची जबाबदारी सांभाळतील.

वाय-फाय व एन्व्हयरमेंट सेन्सर्स
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांबरोबरच संपूर्ण पणजी शहरात मोफत वाय फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याशिवाय एन्व्हार्यरमेंट सेन्सर्सही बसवण्यात येणार आहेत. त्याद्वारे हवामानासंबंधीची माहिती जनतेला मिळू शकेल. पणजी स्मार्ट सिटी होणार असल्याने शहरात स्मार्ट पार्किंगची सोय करण्यात येईल. सुमारे ४ हजार वाहने अशा प्रकारे स्मार्ट पध्दतीने पार्क करता येतील.
स्मार्ट मोटारसायकल पायलटचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ऍपची स्थापना करण्यात येईल. सर्व मोटारसायकल पायलटांना ऍपद्वारे जोडण्यात येईल.

पणजीसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजी शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारण्यात येईल. रायबंदर ते पणजी या दरम्यान भूमीगत वीज वाहिन्या घालण्यात येतील. पणजीतील जलवाहिनी बदलून नवी जलवाहिनी घालण्यात येईल. ओपा जलशुध्दीकरण प्रकल्पातून पणजीसाठी २८ एम्‌एल्‌डी पाण्याची सोय करण्यात येईल.