प्रकाशाचे दान…

0
137

– सिद्धेश वि. गावस (लोकविश्‍वास प्रतिष्ठान)

आपल्या वाट्याला जे त्रास आले ते इतरांना सहन करावे लागता कामा नये या विचाराने आपल्या सहवासात येणार्‍या व्यक्तींना ती वेळीच जागे करण्याचा प्रयत्न करते. कोणाला आवडो न आवडो, पटो अथवा न पटो पण जे वास्तव आहे ते इतराना पटवून देताना हृदयाला कायमस्वरूपी चटका लावून गेलेल्या आपल्या मुलीचा चेहरा तर सदैव तिला खुणावत असेल!!

मी माझा गायनाचा वर्ग संपवून भाभीकडे गेलो. भाभी नाचण्याच्या भाकर्‍या करत होती. मी तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलू लागलो. तेवढ्यात त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती ऐकून मला धक्काच बसला. मी विचार सुद्धा करु शकत नाही अशी गोष्ट त्यांनी मला सांगितली. मी तिला आमच्या विशेष मुलांबद्दल काही ना काही तरी सांगत असतो व तीसुद्धा विशेष मुलांबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असते. बोलता बोलता तिनं मला सांगितलं की एक दिवशी ती आपल्या विद्यार्थीनीच्या घरी तिच्या दोन महिन्याच्या बाळाला बघायला गेली होती. जेव्हा ती त्या विद्यार्थीनीच्या घरी पोहचली तेव्हा तिनं त्या तान्हुल्याला आंघोळ घालून झोपवलं होतं. भाभी जेव्हा पोचली तेव्हा ती म्हणाली, ‘‘आत्ताच तान्हुली झोपली आहे’’. भाभीने म्हटले, ‘‘असू दे. मी आज संध्याकाळपर्यंत थांबणार आहे. तेव्हा ती उठेल तेव्हा मी तिला घेणार’’.
तान्हुली २ महिन्यांची होती व दिसायला खूप गोंडस होती. भाभी संध्याकाळपर्यंत थांबली पण ती तान्हुली काही उठली नाही. तेव्हा भाभीच्या मनात संशय निर्माण झाला. पण त्या बाळाच्या आईला कसं विचारणार… की ती अशीच झोपून असते कां.. म्हणून! जेव्हा भाभी तिच्या घरातून येण्यासाठी निघाली तेव्हा सुद्धा ती तान्हुली झोपलेलीच होती व तिची आई तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होती. पण भाभीला मात्र समजून गेलं होतं की ती तान्हुली ‘विशेष’ आहे. पण तिच्या आईला ते कळत नव्हतं. भाभीसारखीच अवस्था तिच्या माहेरच्या माणसांची व ओळखीतल्या मित्रमंडळींची झाली होती. मुलीचे विशेषत्व कळले होते पण तिच्या आईला सांगणार कोण?? कारण ती तर इतकी उत्साही होती की तान्हुलीसाठी तिनं स्वतः कलात्मकतेने कपडे शिवले होते. भरपूर सारी खेळणी आणली होती. तान्हुलीसाठीची तिच्या डोळ्यातली स्वप्ने पाहूनच तिच्या मुलीचे विशेषत्व सांगण्याचे धाडस कुणाला झाले नव्हते.
जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती देवाला साकडे घालायची… माझ्या पोटी मुलगीच जन्माला येऊ दे.. व तिला मुलगी झाली. पण ती ३-४ महिन्यांची झाली तरी तिला काहीच कळत नव्हतं. तिला भूक लागली तरी ती झोपूनच रहायची. धड मान धरत नाही म्हणून तिनं जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं की ‘तुमची मुलगी विशेष आहे.’ तेव्हा जणू तिच्यावर आभाळच कोसळलं. काय करावे तेच कळेना. देवाने पहिलीच मुलगी दिली व ती अशी? घरातील आनंदी वातावरण एका क्षणात.. दुःखाचा डोंगर कोसळल्यागत झालं. पण.. त्या मातेने स्वतःला कसंबसं सावरलं व मुलीला एका चांगल्या डॉक्टरला दाखवलं. त्यांना डॉक्टरने सांगितलं की तुमची ही तान्हुली जास्त वर्षे जगू शकणार नाही. जगलीच तरी जास्तीत जास्त ३ ते ४ वर्षे! तसेच ती चालणार नाही, बोलणार नाही, तिची सारी दैनंदिन कामे झोपवूनच करावी लागणार. हे् सगळं ऐकून ती माता अजूनच खचून गेली व ती घरी आली. त्या रात्री तान्हुलीचाच विचार करून तिने रात्र घालवली. पण अशा संकटाच्या प्रसंगी तिच्या घरातील मंडळींनी तिला एकटीला न टाकता ते तिच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी भरपूर डॉक्टर केले. ती उठून बसावी म्हणून कुणी सांगेल त्या डॉक्टरकडे ती तिला न्यायची. शेवटी गोव्याबाहेरच्या आयुर्वेदिक डॉक्टरला तिने दाखवलं. त्या डॉ.ने फक्त पैसे खाण्याचं काम केलं. ‘ती होईल बरी…’ या खोट्या आशेवर तिला ठेवलं. त्या मातेला हे माहीत होतं की आपलं मूल काही दिवसांचंच सोबती आहे. म्हणून तिने त्या तान्हुलीचे नेत्र दान करण्याचं ठरवलं व डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तान्हुली तीन वर्षांनंतर हे जग सोडून गेली. पण तिचे नेत्र मात्र अजून कुणाला तरी उजेड देत आहेत. हा त्या मातेच्या हृदयावर झालेला आघात अजून तिच्या मनातून तिला काढून टाकता आलेला नाही. मुलीच्या आठवणीने अजूनही तिचे डोळे पाणावतात.
या जगात जन्माला येऊनही तिनं कधीच जग बघितलं नाही. आपल्या जन्माचा आनंद काही काळापुरता का असेना तिने सर्वांना दिला होता. खरं तर तिच्या आईला ती त्याही अवस्थेत हवी होती. तिची काळजी घेण्यासाठी तिने स्वतःच्या मनाची तयारी केली होतीच. तिचे विशेषत्व कळळ्यावर ती सर्वस्वी कोलमडली खरी. पण तेवढ्याच आत्मविश्‍वासाने आपल्या मासाच्या गोळ्याचे जतन करण्यासाठीसुद्धा ती तत्पर राहिली. तिची सोबत तुटली पण या माऊलीने इतर विशेष मुलांमध्ये तिला पाहिले. आपल्या ओळखीच्या सामाजिक संस्थेला तिने मुलीच्या नावाने मदत करण्याचा विचार केला. मृत्यूनंतर मुलीचे नेत्रदान करण्याचे ठरवले व ते प्रत्यक्षात सुद्धा आणले.
अशी माणसे खूप दुर्मीळ असतात. स्वतःच्या जगण्यातील वेदनेला सहन करीत दुसर्‍या कुणाच्या तरी पदरात प्रकाशाचे दान घालून जीवन उजळून टाकतात. आपल्या वाट्याला जे त्रास आले ते इतरांना सहन करावे लागता कामा नये या विचाराने आपल्या सहवासात येणार्‍या व्यक्तींना ती वेळीच जागे करण्याचा प्रयत्न करते. कोणाला आवडो न आवडो, पटो अथवा न पटो पण जे वास्तव आहे ते इतराना पटवून देताना हृदयाला कायमस्वरूपी चटका लावून गेलेल्या आपल्या मुलीचा चेहरा तर सदैव तिला खुणावत असेल!!