पोळे तपासणी नाक्यावर भ्रष्टाचार

0
2

>> स्टींग ऑपरेशनंतर आपचे पालेकर यांचा आरोप

गोव्यातील पोळे तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या नाक्यावरून परराज्यातून जी वाहने गोव्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळलली जात आहे. त्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत आणि या प्रकरणात गोवा सरकारचे वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
दि. 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, संदेश तेळेकर आणि युवा संघटनेच्या प्रतिनिधींनी अकस्मात पोळे तपासणी नाक्यावर स्टींग ऑपरेशन केले. ते स्वतः एका मालवाहू वाहनात बसून येऊन नाक्यावर काय चालते याचा अनुभव घेतला. ही नुसती सुरूवात असून यापुढे पत्रादेवी, मोले, चोर्ला या ठिकाणीदेखील आपले कार्यकर्ते जाऊन सरकारच्या या कारनाम्याचा पर्दापाश करणार असल्याचे पालेकर यांनी स्पष्ट केले. पोळे नाक्यावरून दिवसाला किमान 2 ते 3 हजार मालवाहू वाहने, प्रवासी गाड्या गोव्यात येतात. त्या प्रत्येक वाहन चालकाकडून प्रवेश फी या नावाखाली दिवसाला 2 ते 3 हजार रू. गोळा केले जातात. त्यासाठी अबकारी खाते आणि पोलीस खात्याने खास एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. ही वसुली करणारी व्यक्ती खासगी व्यक्ती आहे. या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे नाहीत. उलट शेजारच्या माजाळी तपासणी नाक्यावर मात्र प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते असे श्री. पालेकर यांनी म्हटले आहे.