पोलिस व सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती करणार

0
114

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

लवकरच मोठ्या प्रमाणात पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फेही सरकार मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची व हाऊस किपिंगसाठी लागणार्‍या मनुष्यबळाची भरती करणार आहे. १५ ते १६ हजार रु. एवढा पगार या सुरक्षा रक्षकांना असेल. गोमंतकीय युवकांसाठी ही संधी असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले.
पोलीस शिपायांची भरती मोठ्या संख्येने करण्यात येणार असून या संधीचा गोमंतकीय युवकांनी फायदा घ्यावा. सासष्टीसह काही तालुक्यांतील युवक व विशेष करून ख्रिस्ती समाजातील तरुण पोलीस शिपायाच्या नोकरीचा प्रस्ताव दिल्यास नाक मुरडतात असे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.

दक्षिण गोव्यात पोलीस शिपाई म्हणून काम करण्यासाठी सासष्टी तालुक्यासह दक्षिण गोव्यातील अन्य तालुक्यांतील युवकांची मोठ्या प्रमाणात गरज असताना काणकोण तालुक्यातील युवक सोडल्यास अन्य तालुक्यांतील युवक या पदासाठी मुलाखती देत नसल्याचे आढळून आले असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. सासष्टीतील ख्रिस्ती समाजातील युवकांना पोलीस शिपाई पदासाठी मुलाखती देण्यास त्यांचे मन वळवण्याची गरज असून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी हे आव्हान स्वीकारावे अशी सूचना यावेळी पर्रीकर यांनी त्यांना केली. यावेळी रेजिनाल्ड यांनी आपण हे आव्हान स्वीकारतो; पण पोलीस शिपाई पदासाठीच नव्हे तर सर्व सरकारी पदांसाठी सासष्टीतील युवकांनाही प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नाही, असे ते म्हणाले.

या घडीला पोलीस खात्यात जे शिपाई आहेत त्यांपैकी जास्तीत जास्त हे सत्तरी, पेडणे, डिचोली व काणकोण तालुक्यातील असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. पोलीस खात्यात जे पोलीस शिपाई आहेत त्यात केवळ ४.५ टक्के एवढेच ख्रिश्‍चन असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी नमूद केले. पोलिसांसाठी लवकरच पर्वरी येथे ४०० निवासी गाळे बांधणार असल्याची माहितीही पर्रीकर यांनी यावेळी दिली.