पोर्तुगालमधील गोमंतकीयांना मतदार यादीतून वगळू नका

0
96

>> खासदार शांताराम नाईक यांची मागणी

 

दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेले प्राधिकरण गोव्यात आले तरी हे काम लवकर होऊ शकणार नाही. त्यामुळे या प्रश्‍नावर अंतिम तोडगा निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी असलेल्या गोमंतकीयांची नावे
मतदार यादीतून गाळू नयेत, अशी मागणी राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
या प्रश्‍नावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे २४ हजार मतदारांची नावे गाळण्यात आली आहेत तर आणखी सुमारे ६० नावे गाळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले. नावे वगळली जाऊ नयेत यासाठी आपण १९५० च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील सोळाव्या कलमास दुरुस्ती सुचविणारे विधेयक मांडण्यासाठी नोटीस दिल्याचे नाईक यांनी सांगितले. ज्या गोमंतकीयांनी स्वतः भारतीय नागरिकत्व सोडले आहे किंवा इच्छेने आपल्या जन्माची पोर्तुगालमध्ये नोंदणी केली आहे, त्यांचा आपण विचार करीत नाही, असे ते म्हणाले. राज्याच्या मुक्तीपूर्वी जन्मलेल्या अनेकांच्या जन्माची नोंदणी पोर्तुगालमध्ये झाली आहे, असे ते म्हणाले. वरील प्रश्‍नावर अभ्यास करण्यासाठी प्राधिकरणाने गोव्यात येऊन छाननी केली तरी १९५५ च्या भारतीय नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती आणावीच लागेल, असे नाईक यांनी सांगितले. वरील परिस्थितीमुळे पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी झालेल्या येथील लोकांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी भारतीय नागरिकत्व कायद्यातील ९ कलमास सरकारने दुरुस्ती आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली.