पेपरफुटीप्रकरणी कडक कारवाई करणार : जावडेकर

0
135
New Delhi: Students and parents gather outside a coaching center in Rajendra Nagar where Delhi Police conducts an investigation for their alleged involvement in CBSE question paper leak in New Delhi on Thursday. PTI Photo (PTI3_29_2018_000119B)

>> दिल्लीत विद्यार्थी-पालकांची जोरदार निदर्शने

सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या पेपर लिक प्रकरणानंतर काल राजधानी दिल्लीत विद्यार्थी व पालक यांनी जोरदार निदर्शने करीत या संदर्भात आपला निषेध व्यक्त केला. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणास कारणीभूत असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच दहावीच्या गणित व बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या फेरपरीक्षेची तारीख शक्यतो येत्या सोमवारी जाहीर केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

निदर्शनांवेळी अनेक विद्यार्थ्यांनी सर्व विषयांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली.
या पेपर लिक प्रकरणातील गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यादृष्टीने पोलिसांनी पावले टाकली असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्‍वास जावडेकर यांनी व्यक्त केला. या प्रकरणासंदर्भात अंतर्गत चौकशी समितीही नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या यातना व मन:स्थिती आपण समजू शकतो असेही ते म्हणाले. मंडळाच्या कार्यपध्दतीत बदल करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. गुन्हेगारांनी आव्हान निर्माण केल्याने त्या संदर्भात गांभीर्यपूर्वक कृती केली जाईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या तक्रारी नोंदवून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या प्रकरणाचे तपासकाम सुरू झाले आहे.

केंद्रीय मंत्री जावडेकरांच्या
बडतर्फीची मागणी
कॉंग्रेसने सीबीएसई पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मानव संसाधन मंत्री (एचआरडी) प्रकाश जावडेकर व सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता करवाल यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत करावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांशी बोलताना केली.