गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने शनिवारी मध्यरात्री पेडणे तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकत अमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतलेल्या ३ जणांना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
दांडो हरमल येथील छाप्यात छत्रसिंग शिवा (३६, मूळ उत्तराखंड) याच्याकडून २.१०० किलो ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या या चरसची किंमत १० लाख ५० हजार एवढी आहे. गिरकारवाडो येथील छाप्यात चंदन जलाम सिंग (३५, मूळ राजस्थान) याच्याकडून २.३९० किलो ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला. त्याची किंमत सुमारे ११ लाख ९५ हजार एवढी आहे.
केपवाडो येथील छाप्यात राजू लांबा थमंग (३५, मूळ -हिमाचल प्रदेश) याच्याकडून २.५०० किलो ग्रॅम चरस जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १२ लाख ५० हजार एवढी आहे. अमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणातील संशयितांवर कित्येक दिवस पाळत ठेवून त्यांना अटक केली. पोलीस अधीक्षक महेश गावकर, उपअधीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.