आंदोलक शेतकर्‍यांनी फेटाळला अमित शहांचा चर्चेचा प्रस्ताव

0
272

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकर्‍यांचे काल चौथ्या दिवशीही दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्‍यांना बुराडी येथील मैदानात आंदोलन करण्यास सांगून चर्चेसाठी निमंत्रण दिले असता हा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळला.

तसेच शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा सिंधू सीमेवरच आंदोलन करण्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून लेखी स्वरुपात चर्चेचे निमंत्रण मिळाले तरच चर्चा केली जाईल असेही या शेतकर्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीचे गृहमत्री सत्येंद्र जैन यांनी शेतकर्‍यांच्यासोबतच्या चर्चेसाठी कोणतीही अट ठेवू नये असे विधान करत त्यांना पाहिजे तिथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

आंदोलनास राजकीय फूस ः खट्टर
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी, शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनास काही राजकीय पक्ष आणि संघटनांची फूस असल्याचा आरोप केला. दरम्यान, केंद्र सरकारने येत्या तीन डिसेंबरला पंजाबच्या शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे.