पुन्हा सगळं सुरळीत व्हावं!

0
285
  • कु. अदिती हितेंद्र भट
    (बी.ए. बी.एड.)

सगळं पुन्हा सुरळीत व्हावं एवढंच वाटतंय आता. या कोरोना काळात अनेक नाती जमली, काही नाती अतूट बनली तर काही कायमची तुटली. समुद्र मंथनातून कसं पहिलं विष बाहेर सरलं होतं, तसंच सध्या विषाणू बाहेर सरलेत बहुतेक. कदाचित अमृतासारखं पुढे काहीतरी छान वाढून ठेवलं असेल.

च्यायला! या कोरोनाने जिणं मुश्कील करून टाकलंय. एक काळ होता जेव्हा सगळे जण एकत्र येऊन भेटायचे, फिरायला जायचे, दंगा-मस्ती करायचे आणि आता माणूस समोर आला की याला कोरोना तर नसेल ना! आपली प्रिय माणसंसुद्धा भेटली ना तरीही आनंद व्हायच्या आधी टेन्शन पहिले येतं.

पूर्वी लोकांना एकांत हवा असायचा आणि आता तोच नकोसा झालाय. माणसांमधलं संभाषणच संपलंय. मित्रांना फोन केला तर पूर्वी लाख किस्से ऐकायला मिळायचे. चार नवीन शिव्या ऐकू यायच्या, नवीन किस्से रचले जायचे, विनोद व्हायचे आणि आता या सगळ्याची जागा शांततेने घेतली आहे. आता मित्रांशी फोनवर बोलताना सायलेन्स जास्त आणि किस्से कमी असतात. माणसांना जगण्यासाठी माणसांच्या असण्याची गरज किती असते हेही याच कोरोनाने दाखवलं.
यात सगळंच काही वाईट झालं असं म्हणणार नाही मी… पण.. कुठेतरी हे आता थांबायला हवं हीच इच्छा आहे. हे ‘न्यू नॉर्मल’चं फॅड आलंय ना ते नकोसं झालंय. हल्ली पोटात बाहेरचं चविष्ट जाण्याऐवजी काढे आणि गोळ्याच जास्त गेल्यात. त्या पोटाला पण प्रश्न पडला असेल आता की ही बेन इतकं सुधारलं कसं काय म्हणून? पण त्याला तरी काय सांगणार, सुधारलेलो तर आम्ही नाहीच फक्त जरा भीतीच जास्त वाटते सध्या. उगाच नाही तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला…!

हे वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही मुळी. पूर्वी मित्रांसोबत, नातेवाइकांसोबत फिरायला जायच्या तारखा ठरवायचो आणि आता शेवटी कधी भेटलेलो याच्या तारखा आठवतोय. जीवनातला रसच गायब झालाय असं वाटतं. कुठे दंगा-मस्ती नाही, पार्ट्या नाहीत, मिरवणुकी नाही गेलो. बाजार भाषणं पण चालली असती, पण ते पण नाही. सगळं पुन्हा सुरळीत व्हावं एवढंच वाटतंय आता.
या कोरोना काळात अनेक नाती जमली, काही नाती अतूट बनली तर काही कायमची तुटली. समुद्र मंथनातून कसं पहिलं विष बाहेर सरलं होतं, तसंच सध्या विषाणू बाहेर सरलेत बहुतेक. कदाचित अमृतासारखं पुढे काहीतरी छान वाढून ठेवलं असेल. आपण सध्या तरी सगळं छान होणार हीच अपेक्षा मनात बाळगू शकतो. कारण काय आहे ना, आपण फक्त ठरवू शकतो किंवा विचार करू शकतो. त्यामुळे या सध्याच्या परिस्थितीत आपण ‘न्यू नॉर्मल’ला काही काळापुरतं आपलंसं करू आणि स्वतःसाठी काहीतरी ‘न्यू’ पण ‘नॉर्मल’ घडवत राहू जेणेकरून आनंदात तरी राहता येईल. काय म्हणता चालेल ना?