पुढील पावसाळ्यापूर्वी सर्व खाण खंदकांभोवती कुंपण

0
10

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; सूचना फलकही लावणार

राज्यातील सर्व खाणींसह चिरेखाणींच्या खंदकांभोवती पुढील पावसाळ्यापूर्वी कुंपण घालण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. तसेच या चिरेखाणीत कुणी उतरू नये, अशी सूचना देणारे फलकही लावण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यातील समुद्रात, धबधब्यांवर आणि पाण्याने भरलेल्या चिरेखाणींत लोक पोहण्यासाठी उतरतात आणि काही जण बुडून मरण पावण्याच्या घटनाही घडतात, असे डिकॉस्टा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले व या गंभीर प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे; पण या समितीचा फायदा झालेला नाही, असेही डिकॉस्टा म्हणाले.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही याबाबत मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्यात धबधब्यांवर जाऊ नका, खाणीत पोहण्यासाठी उतरू नका, समुद्रात जाऊ नका, वृक्षाखाली उभे राहू नका अशा सूचना देऊनही लोक या सूचनांचे पालन करीत नाही. आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात. राज्यात धबधब्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोण कुठल्या धबधब्यांवर जात असतात, त्याकडे लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.