पुढची लाट कशी असेल?

0
124
  • – डॉ. मधू घोडकीरेकर

पुढील संभाव्य लाटेकरिता लहान मुलांच्या वैद्यकीय व्यवस्थेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहेत ते एवढ्याचसाठी की गंभीर अवस्थेत लहान मुलाची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सामग्री तसेच मनुष्यबळ या गोष्टी त्या मुलांना पूरक असाव्यात. त्या उभारण्यास वेळ लागेल म्हणून ऐनवेळी दमछाक नको म्हणून ही तयारी आहे.

गोव्यात जवळजवळ मागील वर्षाच्या एप्रिलपासून कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडायला सुरुवात झाली. पावसाळा सुरू झाला आणि रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली. येथील महिला रुग्ण जून महिन्याच्या अखेरीस दगावली. पुढे रुग्ण दगावण्याची गती एक-दोन आठवड्यात एक, पुढे दर आठवड्याला एक-दोन अशी वाढत गेली. ऑगस्ट महिना सुरू झाला नि दरदिवशी एक-दोन अशा गतीने मृत्यू होऊ लागले. चतुर्थी आली तेव्हा अशीच वाढत्या क्रमाने रुग्णसंख्या सरकत होती. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उच्चांकी ठरला. याच काळात दरदिवशी कोविडचे निदान होण्याची संख्या पाचशेच्या वर गेली व मृत्युसंख्या सलग तीन दिवस ९ ते १२ पर्यंत राहिली. या काळात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. मर्यादाही समोर आल्या. पुढे रुग्णसंख्या व मृतांची संख्या खाली येत राहिली. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात एक-दोनच दिवस असे असतील की त्या दरम्यान एकही मृत्यू झाला नाही.

गेली चतुर्थी कशी करावी यावर बरेच मंथन झाले. चतुर्थी कशी करावी, पुरोहित यावे की ऑनलाईन पूजा करावी? कुणी सुचविले की एका महिन्यानंतर येणारी चतुर्थी करावी. कुणी सुचविले की फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या गणेश जयंतीच्या वेळी गणेशचतुर्थी करावी. शेवटी साधेपणात गणेशचतुर्थी साजरी झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीपूजेपर्यंतच मर्यादित राहिले. तरीही चतुर्थीनंतर रुग्णसंख्या वाढली व सप्टेंबरमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे रुग्णसंख्या व मृतांच्या संख्येने त्या लाटेतील उच्चांक गाठला. एका महिन्यानंतर येणारी ‘राहिलेली चवथ’ चक्क दोन महिन्यांनी आली. कारण पुढचा महिना अधिक महिना होता. यावेळी प्रत्येक गावात दहा-पंधरा कुटुंबात चतुर्थी झाली. याचे कारण असे की, एक तर कोविड किंवा इतर मृत्यूमुळे मोठ्या प्रमाणात सुतक होते किंवा सगळेच कुटुंब कोविडमुळे विलगीकरणात होते.

दिवाळीच्या आसपासचे सण
‘राहिलेली चतुर्थी’ होईतोपर्यंत नवरात्र सुरू होते. येथे पोचेपर्यंत लॉकडाऊनचे नियम शिथील होत होते. पण सप्टेंबरची परिस्थिती अनुभवल्याने गर्दी करून उत्सव करायला जास्त लोक पुढे येत नव्हते. यात सर्वात जास्त कोविड फोफावू शकला असता त्या नरकासुर प्रतिमांच्या स्पर्धा कुठे-कुठे झाल्या पण मर्यादित प्रमाणात. सरस्वतीपूजन, सार्वजनिक लक्ष्मीपूजन सगळेच मर्यादेत झाले. पुढे नोव्हेंबर-डिसेंबर म्हणता म्हणता नववर्ष आले. या काळात कोविड वा कोरोना गेला कुणीकडे असे विचारायची परिस्थिती निर्माण झाली होती. दोनशेची परवानगी असूनही लग्न, वाढदिवस, बारसे वगैरे कार्यक्रमांना परवानगीच्या पाच पटीने लोक उपस्थित राहत होते. हे सर्व थांबले ते दुसर्‍या लाटेचा विस्फोट झाला तेव्हा.

तोंड झाकण्याचे दिवस
भारताच्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्यांदाच जनता कर्फू जाहीर केला व तोंड मास्कने किंवा कपड्याने झाकावे असे आवाहन केले. तेव्हा फार्मसीमध्ये मिळणार्‍या मास्कशिवाय कुठलेही मास्क उपलब्ध नव्हते. पुढे लोकांनी घरातच मास्क तयार करायला सुरुवात केली. सर्व तर्‍हाच्या मास्कना बाजारपेठ उपलब्ध झाली. पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतचे मास्क आज उपलब्ध आहेत. सुरुवातीला लोक अधूनमधून मास्क वापरायचे. आज मितीला समोर कुणी आला अन् आपल्याकडे मास्क नसल्यास आपणच खजील होतो. या वर्षभरात सवय झालेले हे वस्त्र बर्‍याच जणांसाठी उपयुक्त शस्त्रही ठरले आहे.

‘कोविड’चे बदलते नियम
अगदी सुरुवातीचे रुग्ण इएसआय इस्पितळात दाखल झाले. त्यांनी जवळ जवळ महिन्याभराचा पाहुणचार घेतला. मागाहून आता कळते ते असे की, ते अगदी सौम्य लक्षणाचे रुग्ण होते. तेव्हा हॉस्पिटलमधून सुट्टी द्यायची नियमावली ही होती की, दर चार दिवसांनंतर त्याची स्वॅब स्टेट घ्यायची. लगोलग दोन दिवसातून एकदा असे तीन वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आले तर रुग्णाला हॉस्पिटलमधून सुट्टी दिली जायची. त्यानंतर त्याला पुढील चौदा दिवस विलगीकरण केंद्रात राहावे लागायचे व शेवटी सात दिवस होमकोरंटाईन व्हावे लागायचे. ही नियमावली साधारण जूनपर्यंत चालली. त्यानंतर एकदा रिपोर्ट नकारात्मक आला की हॉस्पिटलमधून सुट्टी द्यायचा नियम आला. रुग्णसंख्या वाढू लागली तेव्हा लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा नियम आला. आता रुग्ण विनालक्षणवाले, सौम्य लक्षणवाले, प्रमुख लक्षणवाले व गंभीर परिस्थितले अशा प्रकारात गणले जाऊ लागले. आता विनालक्षणवाले रुग्ण घरातच विलगीकरणात राहू लागले. सौम्य लक्षणवाले विलगीकरण केंद्रात व प्रमुख लक्षणवाले व गंभीर परिस्थितीवाले हॉस्पिटलात अशी व्यवस्था होऊ लागली. दुसरी लाट आल्याचे पक्के झाले तेव्हा गंभीर रुग्णाभोवतीच लक्ष केंद्रित करण्यात आले. विलगीकरणाचा मूळ नियमच बदलला. आधी घरात विलगीकरणासाठी परवानगी मागावी लागत होती, आता ती रद्द करण्यात आली आहे. एकदा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की रुग्ण व त्याचे नातेवाईक घरातच विलगीकरणात राहणार असे गृहित धरण्यात आले आहे. विलगीकरण केंद्रात जाणे आता रुग्णाच्या इच्छेवर अवलंबून आहे आणि विलगीकरणाचा काळही दहा दिवसांवर आला आहे.

श्‍वास रोखणारा रोग
कोविड हा कोरोना कुटुंबातील एक रोग हे सर्वांनाच कळले आहे. सर्दी-खोकला यापूर्वीच्या कोरोनासारखाच; पण या कोविड-१९ ने सर्दी-खोकल्यापुढे जाऊन न्यूमोनियाचा घाट घातलाय. त्याच्यापुढे सगळे जग हतबल झाले आहे. युरोपात आलेली पहिली लाट ही भारतात आलेल्या दुसर्‍या लाटेइतकी तीव्र होती. त्यामुळे तेव्हा त्यांच्याकडे ऑक्सिजन व्हेंटिलेटरचा भयंकर तुटवडा भासला होता. मुंबई-दिल्ली येथे पहिल्या लाटेत तीच परिस्थिती होती. वाटले होते की तेथे रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे हा तुटवडा जाणवला असावा. पण दुसर्‍या लाटेत खरोखरच गोवेकरांचा श्‍वास रोखला गेला. आता कसं होणार याची धडकीच भरली. ऑक्सिजन पुरवठ्यावर मोठी चर्चा सुरू झाली. पर्यायी आधुनिक ऑक्सिजन पुरवठ्याविषयी तत्काळ शोध सुरू झाले अन् पोहोचलाही. पण तोपर्यंत आणखी तोडमोड करून पुढे गेला. सलग दोन दिवस पंच्याहत्तरीच्या आसपास लोकांना आम्ही जीवदान देऊ शकलो नाही. हा लेख लिहीपर्यंत दरदिन मृतांची संख्या दहाच्या आसपास आहे, म्हणजे पहिल्या लाटेतील सर्वात कठीण दिवस होते ती परिस्थिती आज आहे.

ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण वारले असा आरोप होतो आहे. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. पण ज्यांनी-ज्यांनी ते दहा-पंधरा दिवस जवळून पाहिले, ते किती खडतर होते याची प्रचिती त्यांनाच आली. कितीही ऑक्सिजन असला तरी तो त्यावेळी कमीच पडत होता. कारण त्यावेळी रुग्णसंख्या कल्पनेबाहेर वाढली. या विषाणूने एवढा धक्का दिला की एकूणच व्यवस्था हादरून गेली. आलेल्या परिस्थितीचे परीक्षण व निरीक्षण करण्याइतकी विचारशक्तीही शाबूत नव्हती. कित्येकजण मला विचारत होते, आधी अमुक काळादरम्यान ऑक्सिजन दाब खाली जात असल्याने त्याच काळात अधिक मृत्यू होत होते. पण चौकशीनंतर तसे काही झाले नसल्याचे जाहीर केले. यातील खरे सत्य काय? त्या भयंकर परिस्थितीत एखाद्याला वरचेवर निरीक्षणात दिसले की कदाचित तसे होत असावे. त्यावर योग्य अभ्यास करण्याची गरज आहे. अर्थात या काळात गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर नकारात्मक चित्र गेले हे वाईट झाले. या वाईटातून पुढे चांगले व्हायचे असेल त्याचे स्वागतच करूया.

लोकांचे कोविड ज्ञान
चीनच्या वुहानमध्ये सुरू झालेल्या वृत्तापासून प्रत्यक्ष आपल्या घरापर्यंत या कोविडने प्रवास केला आहे. पूर्वी आम्ही काय सांगतो व लिहितो यावरून कोविड कसा असणार याविषयी लोक आपापल्या परीने अंदाज बांधत होते. त्यातल्या त्यात सोशल मीडियाने माहिती व ज्ञान ओतून सगळ्यांचे डोके सुन्न केले होते. आज पंधरा-सोळा लाख लोकवस्तीच्या गोव्यात जवळ जवळ पावणेदोन लाख लोकांनी कोविड म्हणजे काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून ते परत आले आहेत. त्यातील जवळजवळ पावणे दोन टक्के लोक म्हणजे जवळजवळ तीन हजार लोक आमच्यामध्ये त्यांचे अनुभव सांगायला नाहीत. जवळजवळ वीसहून जास्त अशी कुटुंबे आहेत जिथे एकापेक्षा जास्त कुटुंबीय एकाच घरात कोविडमुळे वारले आहेत. आतापर्यंत ज्या साथी येऊन गेल्या, त्यांचा अनुभव असा होता की, लोकसंख्येच्या पाच-सहा टक्केच्या आसपास संक्रमित झाले की इम्युनिटी म्हणजे सामुदायिक प्रतिकारशक्ती सगळीकडे पसरते व साथीचा प्रसार कमी होतो. याबाबतीतही या कोविड साथीने मागच्या सर्व साथींना मागे टाकले आहे.

पहिली लाट ओसरत होती तेव्हा एक गोष्ट जाणवली की जेव्हा कोविड प्रत्यक्ष इथे नव्हता तेव्हा दुसरीकडील बातम्या वाचून लोक घाबरले होते. पण प्रत्यक्ष कोविड सर्वत्र शिरकाव करीत होता तेव्हा कोविड आम्हालाच घाबरतो अशा थाटात लोक वावरत होते. दुसर्‍या लाटेने या सर्वांना जमिनीवर आणले.

लसीचा प्रवास
सन २०२१ च्या आगमनापासून लसीचा प्रवास सुरू झाला व चर्चा, आवाहने, टीका तेव्हापासून सुरू झाल्या त्या आजपर्यंत आहेत. सुरुवातीला ज्याच्यासाठी प्राधान्यक्रमाने लसीकरण उपलब्ध करून दिले त्यातील कित्येकजण मागे-पुढे झाले. आपला उपयोग लसीकरणाच्या प्रयोगासाठी केला जातोय की काय अशी पाल कित्येकांच्या मनात चुकचुकली. त्याचा परिणाम असा झाला की, अपेक्षित प्रमाणात लसीकरण झाले नाही. तशातच दुसर्‍या लाटेने हाहाकार उडवला. कुणाला कोविड होऊ शकतो, कुणाला नाही, कुणाच्या जीवावर बेतू शकतो, कुणावर नाही याच्या व्याख्याच या दुसर्‍या लाटेत बदलल्या. आपल्यापुढचा माणूस डोळ्यांदेखत गेला हे बहुतेकांनी पाहिले. दुसर्‍या लाटेच्या ऐन भरात लसीकरणाची गतीही कमी करावी लागली. आता लाट ओसरतेय असे चित्र तयार होऊ लागल्यावर प्राधान्यक्रमाची अट संपुष्टात आली. आता लसीकरणाला प्रतिसाद वाढतो आहे. जे टीका करायचे तेही आता टिका महोत्सवात जाऊन लस घेत आहेत. रामदेवानीही काहीतरी लसीकरणावर वायफळ टीका केली, पण त्यांनाही लसीकरणावर सकारात्मक भाष्य करावंच लागलं. कारण आजच्या घडीला तो एकमेव आशेचा किरण आहे.

आता हा लसीचा पहिला डोस सहज उपलब्ध होतो आहे. दुसर्‍या लसीचा कालावधी मात्र थोडा-थोडा वाढतो आहे.

कोविडची शाळा
आम्ही कुणावरही ओरडलो की ‘त्याची चांगली शाळा घेतली’ असे म्हणतो. या शैक्षणिक वर्षात कोविडने सगळ्या जगाची शाळा घेतली. मागेच ‘वाया (न)गेलेले शैक्षणिक वर्ष’ हा लेख प्रसिद्ध झाला होता, ज्यात याबाबतच्या साधकबाधक बाजूवर सविस्तर लिहिले होते. एक गोष्ट खरी की, मुले मात्र शाळेत पाय न ठेवलेले शालेय वर्ष म्हणून हे वर्ष कायम लक्षात ठेवतील. मुलांची शैक्षणिक मूल्यमापनाची संपूर्ण कल्पनाच या काळात बदलून गेली. तरी या काळात पाल्य व पालक एकमेकांजवळ इतके आले जे मागील कित्येक वर्षांत झाले नव्हते.

जेव्हा साथीचा धोका भारतातही होऊ शकतो अशी चिन्हे दिसू लागली तेव्हा सर्वात आधी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मागच्या वर्षी कशाबशा दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या. यंदा काही पेपर झाले, बाकीचे राहिले ते राहिलेच. आता उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, गुणवत्ता यादी तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती सोडून नव्या पद्धतीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. याचे कारण हे की, सगळे आटोक्यात आले आहे अशा मनःस्थितीत असतानाच दुसर्‍या लाटेचा दणका एवढा अनपेक्षित होता की यातून कसे सावरायचे हा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.

पालकांचे, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे काय ते लवकर ठरो असे शिक्षणतज्ज्ञ सध्या देवाकडे प्रार्थना करीत आहेत. या सर्व परिस्थितीवर लसीकरण हा आशावादाचा किरण एकमेकाची समजूत काढायला मदत करीत आहे.

हॉस्पिटलांचे बदलते रूप
कोविड काळात हॉस्पिटल या संकल्पनेचे स्वरूपच बदलून गेले. सुरुवातीला वाटले होते की एकच हॉस्पिटल पुरेसे असेल. पण आकांताची परिस्थिती निर्माण झाली तशी मोठी-लहान, सरकारी-खाजगी हे न बघता मिळेल ते हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल झाले. दुसर्‍या लाटेत विलगीकरण केंद्रांना अत्यल्प प्रतिसाद लाभला. लोक घरीच विलगीकरण पर्याय स्वीकारू लागले. या परिस्थितीत विलगीकरण केंद्र व हॉस्पिटल यांच्या मधल्या प्रकारचे हॉस्पिटल म्हणजे ‘स्टेपअप’ हॉस्पिटलचा पर्याय पुढे आला. आज गोव्यात दोन-तीन ठिकाणी असे प्रकल्प सुरू केले आहेत. सद्यस्थितीत रुग्णसंख्या कमी झाल्याने येथे जास्त रुग्ण ठेवले जात नाहीत. कारण नियमित हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध आहेत. पण पुढे वेळ आली तर याच स्टेपअप हॉस्पिटलचा उपयोग मुंबईत बिकेसी मैदानात उभ्या असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या जंबो कोविड केअरच्या धर्तीवर येथेही अशी तात्पुरती इस्पितळे उभारावी लागतील.
पुढची लाट कशी असेल?
सगळेच हा प्रश्‍न विचारतात की, तिसरी लाट येणार की नाही? कधी येईल? कशी असेल? वगैरे. मी वर्षापूर्वीच्या लेखाच्या शेवटी हेच म्हटले होते की भरती-ओहोटी हा निसर्गाचा नियम आहे. लाटा या भरती-ओहोटीचाच एक अविभाज्य भाग. जोपर्यंत समुद्रात पाणी आहे तोपर्यंत लाटा येणार-जाणार. त्याचप्रमाणे कोविड-१९ विषाणू जगातून संपूर्ण संपत नाही तोपर्यंत लाटा येणार व जाणार. येऊन गेलेली लाट कशी होती यावर लिहिणे सोपे, पण पुढची लाट नेमकी कशी असेल हे सांगणे कठीण. पुढची लाट येऊ नये असे सर्वांनाच वाटते. आलीच तर प्रभावहीन असावी अशी प्रार्थना आपण करू शकतो. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा पाच ते सहा पट भयंकर व प्रलयकारी होती. आता वैद्यकीय क्षेत्र स्वतःला तयार करतेय ते ही संभावना घेऊन की समजा तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा पाच पट जास्त भयंकर असली तर काय करायचे? तसेच ती पटकन आली तर कसे सामोरे जायचे? समजा तिसरी लाट आलीच नाही किंवा पहिल्या लाटेपेक्षा सौम्य आली तर आहे ती व्यवस्था पुरेशी आहे. पुढे जाऊन पहिल्या लाटेपेक्षा जास्त पण दुसर्‍यापेक्षा कमी आली तरीही आहे त्या व्यवस्थेत निभावून घेता येईल. पहिल्या दोन लाटांत लहान मुलांवर जास्त परिणाम झाला नाही. गोव्यात काही हजार मुले बाधीत झाली होती व त्यातील दहाएक मात्र मुले दगावली, ज्यांना इतर आजार होते. पुढील संभाव्य लाटेकरिता लहान मुलांच्या वैद्यकीय व्यवस्थेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहेत ते एवढ्याचसाठी की गंभीर अवस्थेत लहान मुलाची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सामग्री तसेच मनुष्यबळ या गोष्टी त्या मुलांना पूरक असाव्यात. त्या उभारण्यास वेळ लागेल म्हणून ऐनवेळी दमछाक नको म्हणून ही तयारी आहे.