पावसाळ्यातील वातप्रकोप

0
1166
  • डॉ. मनाली म. पवार

पावसाळ्यात आहारात मधुर, आंबट, खारट या चवीचे पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. त्यामुळे वाढलेला वातदोष कमी होण्यास मदत होते. जेवणात स्निग्ध पदार्थही भरपूर हवेत. विशेषतः तूप अधिक प्रमाणात. तूप हे वातप्रशमन करणारे व त्याचबरोबर उत्कृष्ट अग्निवर्धक असल्याने उपयुक्त ठरते.

पावसाळा सुरू होताच झाडे हिरवीगार दिसू लागतात. त्यावर विविध फुले फुलतात. ढगांचा गडगडाट होतो. मयूर आणि बेडकांच्या गर्जनेने आसमंत दुमदुमून जातो. सर्वत्र हिरवेगार गवत उगवते. असे सगळे छान, कवितामय वातावरण जरी असले तरी अनेक रोगांचा उगमही पावसाळ्यातच जास्त होतो कारण वर्षा ऋतूंत असणार्‍या सततच्या पावसामुळे हवेत सर्वत्र आर्दता वाढीस लागते व गारठाही पुष्कळ प्रमाणात येतो. उन्हाळ्यात संचित झालेल्या वाताला रुक्षतेबरोबरच शैत्याचीही जोड मिळाल्याने पावसाळ्यात हा वात अधिकच प्रकूपित होतो.

वातप्रकोप म्हणजे आपल्या शरीरातील प्राकृत वात दूषित होतो व तो जास्त प्रमाणात वाढतो. त्याचबरोबर पावसाळ्यात वनस्पती नवीन व अल्पवीर्य असतात. त्यांच्यामध्ये अम्लरस अधिक असतो. बाह्य वातावरणातील आर्द्रता व इतर बाबींमुळे अग्निमांद्यही फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. दुर्बलता शरीरात अधिकच जाणवू लागते. सतत कोसळणार्‍या पावसाने गढूळ झालेले पाणी अनेक तर्‍हेच्या रोगराईला पसरवते व रोग उत्पन्न करते.

उन्हाळ्यात संचित झालेला म्हणजेच शरीरात साठलेला वात दोष पावसाळ्याच्या शीत गुणामुळे अधिकच वाढतो आणि म्हणूनच पावसाळ्यात अनेक प्रकारचे वातव्याधी उत्पन्न होतात. ऋतू बदलला म्हणजे आपल्या आहार-विहारामध्ये बदल घडवायला पाहिजे, पण आपण हे प्रकर्षाने विसरतो व रोगांना आमंत्रण देतो. उन्हाळ्यात सूर्याचा ताप व प्रखरता लक्षात घेता शीतोपचार अपेक्षित असतात. द्रव पदार्थ भरपूर घेण्यास सांगितले आहे. पण हाच आहार आपण पावसाळ्यात तसाच घेऊ शकत नाही. कारण लघु, शीत, रुक्ष गुणांची वृद्धी झाली म्हणजे वाताचीही वृद्धी होते व परिणामतः वातव्याधी उत्पन्न होतात.

प्राकृतावस्थेतील वायू हा शरीराची उत्पत्ती, वाढ, धारणा, विनाश आदी सर्वच कर्मास कारणीभूत असतो. वायू हा सर्वव्यापी आहे. तो उत्पादक, रक्षक आहे. यासाठी प्राकृत वायूचे रक्षण करावे. हाच वायू विकृत झाला तर अनेक प्रकारचे अनर्थ त्यामुळे ओढवतात व पावसाळा हा वाताचा प्रकोपाचा काळ असल्याने या ऋतूत त्याची विशेष काळजी घ्यावी.

वातव्याधी वाढण्याची कारणे….
– रुक्ष, शीत, अल्प, तिक्त, कषाय अशा अन्नाचे सेवन.
– पावसाळ्यात तेलाचा वापर सांगितला आहे, पण आपण मात्र तेलात तळलेल्या पदार्थांचा जास्त वापर करतो.
– बाहेर धो धो पाऊस पडतो आहे आणि आपण थ्रील म्हणून आईस्क्रीम, फ्रूट ज्यूस, फ्रुट शेक, सॉफ्ट ड्रिन्क्स अगदी उन्हाळा असल्याप्रमाणेच पितो.
– बेकरी उत्पादनांचे अतिसेवन.
– फास्ट फूड, जंक फूडचा अतिप्रमाणात वापर.
– सुकवलेले मांस, माश्यांचा अतिप्रमाणात उपयोग.
– जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा अति जागरण.
– विविध प्रकारचा अतिव्यायाम (उड्या मारणे, पोहणे, फार चालणे इ.)
– अतिश्रम, अतिचिंता, धातुक्षय
– अजीर्ण झाले असता अन्नसेवन, आमोत्पत्ती
– वर्षाऋतुमध्ये अन्न जीर्ण झाल्यानंतर पहाटे तसेच सायंकाळच्या प्रथम प्रहरी स्वभावतःच वातप्रकोप आढळतो.
पावसाळ्यात दिसणारी वातप्रकोपाची लक्षणे …
– वाताचा प्रकोप झाला म्हणजे पहिले लक्षण म्हणजे वेदना उत्पन्न होतात. सर्वांगवेदना किंवा अस्थि किंवा हस्त-पाद-पृच्छ-शिरप्रदेश या ठिकाणी जखडल्याप्रमाणे वेदना, अंगशोथ
– निद्रानाश, गात्रसुप्तता
– वाताचे जे पाच प्रकार आहेत त्यापैकी कोणत्या वायुकडून कोणती लक्षणे उत्पन्न होतात हे त्या त्या दोषांतील विकृत झालेल्या गुणांवरून दिसतात. उदा. प्राणवायूच्या प्रकोपातून चक्षु आदी इंद्रियांचा उपघात, तृष्णा, कास, खास इ.
– उदानवायुच्या प्रकोपातून कण्ठरोध, गलगंड व अन्य विकार.
– व्यान वायुच्या प्रकोपातून शुक्रहानी, उत्साह व बल हानी, शोथ, चित्तविभ्रंश, सर्वांगरोग, रोमहर्ष निर्माण होतो.
– समानवायुच्या प्रकोपातून शूल, ग्रहणी, अन्य आमाशय व पक्वाशयातील व्याधी.
अपान वायुच्या प्रकोपातून मूत्र योग, अर्श, पक्वाशयाचे विविध रोग.
पावसाळ्यातील वातप्रकोपावर उपाययोजना ….
– पावसाळ्यात वातप्रकोपाबरोबर दौर्बल्य फार मोठ्या प्रमाणात आलेले असते म्हणून अशा वेळी बल्य (बळ) वाढविण्यासाठी टॉनिक देतात, पण सर्वसामान्यपणे ही औषधे शीतवीर्यात्मक व पचनास जड अशीच असतात. म्हणून या टॉनिकच्या वापराने अधिक लाभ होत नाही, उलट याने वातप्रकोप व अग्निमांद्य अधिकच वाढते. म्हणून प्रथमतः जाठराग्नी वाढवून पचनशख्ती सुधारल्यानंतरच हळुहळू बल्य पदार्थाचा वापर करावा.
– रोजच्या जेवणात जे धान्य वापरायचे ते एक वर्षापेक्षा जास्त जुने असावे. नाइलाजाने नवीन धान्य वापरावेच लागले तर ते धान्य शिजविण्यापूर्वी भाजून घ्यावे. भाजल्याने अग्निसंस्कारामुळे अभिष्यंदि गुण कमी होऊन धान्य पचण्यास हलके होते.
– साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या यांचा वापर करावा.
– पावसाळ्यात वाताचे शमन होण्यासाठी दूध-भात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी असे सहज पचणारे पदार्थ आहारात असावेत.
– दही या ऋतूंत अगदी निषिद्ध आहे. पण ताक मात्र लसूण, मोहरी, हिंग यांची फोडणी देऊन वापरू शकतो.
– जेवणामध्ये सर्व तर्‍हेची पक्वान्ने टाळावीत. स्वयंपाकामध्ये हिंग, सुंठ, मिरे, जिरे, पिंपळी, आले, लिंबू, पदिना, कोथिंबीर, लसूण यांसारखी दीपन-पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात वापरावीत.
– लसूण उष्ण व स्निग्ध असून उत्तम वातनाशक व अग्निवर्धकही असल्यानेत या ऋतूंत वापरावीत.,
– दुधीभोपळा, दोडका, पडवळ, भेंडीसारख्या फळभाज्यांचा उपयोग अधिक प्रमाणात करावा.
– पालेभाज्यांचा वापर करू नये. कारण या भाज्या अम्लरसयुक्त व अल्पवीर्यात्मक असतात.
– मूग. तूर यांसारखे डाळींचे वरण खावे.
– तेला-तुपासारखे स्निग्ध पदार्थ अधिक प्रमाणात वापरावेत. तळलेले पदार्थ मात्र कटाक्षाने खाणे टाळले पाहिजे. अगदी पापडसुद्धा भाजून खावा, तळून नव्हे.
– इडली, डोसा यांसारखे पदार्थ सकाळच्या न्याहारीच्या वेळी वापरले जाणारे पदार्थही आंबवलेल्या पदार्थांपासूनच बनविले जात असल्याने पावसाळ्यात निषिद्ध ठरतात.
– उपमासारखा पदार्थ – गव्हाचा रवा चांगला तूपात भाजून आले, कढीपत्ता, लसूण, लिंबू यांसारखी दीपन द्रव्ये वापरून करतात त्यामुळे पथ्यकर आहे.
– पावसाळ्यात आहारात मधुर, आंबट, खारट या चवीचे पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. त्यामुळे वाढलेला वातदोष कमी होण्यास मदत होते. जेवणात स्निग्ध पदार्थही भरपूर हवेत. विशेषतः तूप अधिक प्रमाणात. तूप हे वातप्रशमन करणारे व त्याचबरोबर उत्कृष्ट अग्निवर्धक असल्याने उपयुक्त ठरते.
– स्वयंपाक करताना फोडणीसाठी भरपूर तेल वापरावे. मोहरी व हिंग यांचीही फोडणी करताना मुक्त हस्ताने वापर करावा.
– पिण्याचे पाणी चांगले उकळून प्यावे. पिण्यास व आंघोळीसाठीही गरम पाण्याचाच उपयोग करावा.
– अतिव्यायाम, साहस, दिवसा झोपणे, रात्री जागरण या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्या.
थोडक्यात सर्वच आहार-विहार हा वातदोष कमी करणारा, पचण्यास हलका व योग्य प्रमाणात घ्यावा.
वातप्रकोपामध्ये उपक्रम व चिकित्सा ….
– या ऋतुसाठी हितकर उपक्रम म्हणजे ‘बस्ती’ होय. बस्ती हा शोधनचिकित्सेतील एक उपक्रम असून वातदोषांवरील प्रमुख कार्यकारी असा उपक्रम आहे म्हणून बस्तीच्या नित्य वापराने पावसाळ्यातील वातप्रकोप टाळता येतो.
– या ऋतूंत शैत्यामुळे अनेक प्रकारचे प्राणवहस्रोतसाचे रोग उत्पन्न होतात. यासाठी आलेपाक, अद्रिक स्वरस, तुलसी स्वरस, अडूळश्यापासून तयार होणारी औषधे विशेष कार्यकारी ठरतात.
– रास्नादिकाढा, द्राक्षारिष्ट, द्राक्षासव, पंचकोलासवसारखी औषधे वातशमनासाठी उपयुक्त ठरतात.
अशा प्रकारे पावसाळ्यात होणारा वातप्रकोप उष्ण स्निग्ध उपायांनी शमन करावा व वातव्याधी टाळावेत.