पावसाचा जोर कायम

0
92

>> ताळगावात पूर; राज्यभर पडझड

 

राज्यात पावसाचा जोर कायम असून काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाने गोव्याला झोडपले. त्यामुळे राज्यभरात पडझड व अपघातांच्या घटना घडल्या. काणकोण तालुक्यातील पैंगीण-तामणे येथे राष्ट्रीय महामार्ग १७ वर दरड कोसळून पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक खोळंबून पडली. तर जोरदार पावसामुळे वास्को समुद्रात शिपयार्डाने दुरुस्तीसाठी नांगरून ठेवलेले सहारा इंडिया कंपनीचे ‘एमव्ही क्विंग’ हे जहाज पाण्यात बुडता बुडता तटरक्षक दलाने वाचवल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, पणजीत गेल्या २४ तासांत साडेचार इंच पाऊस झाल्याचे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले. राजधानी पणजी व आसपासचे काही भाग काल मुसळधार पावसामुळे पाण्याखाली आले. पूरप्रवण असलेल्या कामराभाट येथे काल पूर आला. त्यामुळे तेथे राहणार्‍या लोकांची तारांबळ उडाली. तर सांतइनेज येथे काकुलो मॉलजवळील रस्ता पाण्याखाली आला.
दरम्यान, ताळगावमधील कामराभाट येथे पूरसदृश्य परिस्थिती असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पणजी अग्निशामक दलाने पूर परिसरावर पूर्ण लक्ष ठेवले आहे. दलाने आपली एक गाडी व पाच जवानांना तेथे तैनात केले आहे. पुरात कुणी बुडाल्यास मदत करता यावी यासाठी ही सोय करण्यात आली असल्याचे
अग्निशामक दलातील सूत्रांनी सांगितले.
झाडे कोसळली
दरम्यान, काल पणजी शहरात ५ ठिकाणी झाडे कोसळली. दोनापावला येथे दोन ठिकाणी झाडे कोसळली. त्यापैकी एक झाड रस्त्यावर कोसळले. केवणे-ताळगाव येथेही एक झाड रस्त्यावर कोसळले. मात्र, कुणीही त्यामुळे जखमी झाल्याचे वृत्त नाही.