पावल्युचेंकोवाकडून कर्बर बाहेर!

0
106

रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेंकोवाने काल सोमवारी जोरदार खेळ दाखवत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धेसाठी तिसावे मानांकन लाभलेल्या पावल्युचेंकोवाने चौथ्या फेरीत जर्मनीच्या माजी विजेत्या व १७व्या मानांकित अँजेलिक कर्बरचा ६-७ (५), ७-६ (४), ६-२ असा पराभव केला.

१७ व्या मानांकित कर्बरने पहिल्या सेटमध्ये ५-२ अशा पिछाडीवरून सेट टायब्रेकरपर्यंत खेचला. टायब्रेकरमध्येदेखील ती ०-३ अशा पिछाडीवर पडली होती. परंतु, सर्व अनुभव पणाला लावत तिने पहिला सेट आपल्या नावे केला. केवळ १२ टाळत्या येण्यासारख्या चुका व तब्बल २८ विजयी फटके लगावूनही पावल्युचेंकोवाला सामन्यात पिछाडीवर पडावे लागले. दुसर्‍या सेटमध्येदेखील कर्बरने तीन सेट पॉईंट्‌स वाचवताना सामना टायब्रेकरपर्यंत खेचला. पण, यावेळेत पावल्युचेंकोवाने पहिल्या टायब्रेकरमधील चुकांची पुनरावृत्ती टाळताना सेट जिंकत सामना बरोबरीच्या स्थितीत आणला.

तिसर्‍या सेटमध्ये कर्बरला थकव्यामुळे अपेक्षित खेळ दाखवता आला नाही. या सेटमध्ये पावल्युचेंकोवाने कर्बरची सर्व्हिस तीन वेळा भेदली. उपांत्यपूर्व फेरीत पावल्युचेंकोवाचा सामना माजी फ्रेंच ओपन विजेत्या गार्बिन मुगुरुझा हिच्याशी होणार आहे. बिगमानांकित मुगुरुझाने नवव्या मानांकित किकी बर्टेन्सला एकतर्फी लढतीत ६-३, ६-३ असे हरविले. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित राफेल नदालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना २३व्या मानांकित निक किर्गियोसला ६-३, ३-६, ७-६, ७-६ असे पराजित केले. हा सामना ३ तास ३८ मिनिटे चालला.

पाचव्या मानांकित डॉमनिक थिमने १०व्या मानांकित गाईल मोनफिल्सला ६-२, ६-४, ६-४ असे नमवून ‘अंतिम ८’ मध्ये प्रवेश केला. स्वित्झर्लंडच्या १५व्या मानांकित स्टॅन वावरिंका याने चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याला संघर्षपूर्ण लढतीत ६-२, २-६, ४-६, ७-६, ६-२ असे नमवून आपले आव्हान कायम ठेवले.