पालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज वाढण्याची अपेक्षा

0
168

>> आतापर्यंत २६ अर्ज दाखल, ४ मार्चपर्यंत मुदत

राज्यातील पणजी महानगरपालिका, अकरा नगरपालिकांच्या २० मार्च २०२१ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सोमवार १ मार्चपासून गती प्राप्त होणार आहे. या निवडणुकीसाठी ४ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी गेल्या २५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या तीन दिवसात कमी प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुढील चार दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसांत २६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर, पंचायत पोटनिवडणुकीसाठी तीन दिवसांत ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजूनपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. साखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ मधील पोटनिवडणुकीसाठी अजूनपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

राज्यातील २१ ग्रामपंचायतीमधील २२ प्रभागांसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. या पंचायत पोटनिवडणुकीसाठी फक्त वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग ४ मध्ये आत्तापर्यंत ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.