पारदर्शक पत्रकारच जबाबदारीने लिहू शकतो : भरतकुमार राऊत

0
89

कोणताही पत्रकार पारदर्शक व शुध्द असला तरच एखाद्या विषयावर पारदर्शकपणे व जबाबदारीने लिहू शकतो असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत यांनी काल येथे आयोजित राष्ट्रीय पत्रकारिता दिवस कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
सुदृढ भारत बनविण्यासाठी केवळ रस्ते स्वच्छ करून चालणार नाहीत. पत्रकारांसह देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये आंतरिक शुध्दता असणे आवश्यक आहे. तशी मानसिकता तयार झाली पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले.गोवा श्रमिक पत्रकार संघटना व माहिती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर माहिती मंत्री मिलींद नाईक, माहिती सचिव पवनकुमार सैन, गुजचे अध्यक्ष किशोर नाईक, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू आदी उपस्थित होते.
सर्वांगिण विकासामुळेच सुदृढ भारत
कोणताही पत्रकार पारदर्शक व शुध्द असला तरच एखाद्या विषयावर पारदर्शकपणे व जबाबदारीने लिहू शकतो, असे ते म्हणाले. सुदृढ भारत बनविण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. सर्वांगिण विकास झाला तरच सुदृढ भारत बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एखाद्या मंत्र्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यावर जनतेकडे चर्चा करणे महत्वाचे असते. तसे करून सरकारने निर्णय घेतला तरच त्यात पारदर्शकता दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या बाबतीत प्रत्यक्षात पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळेच पत्रकारांना माहिती हक्क कायद्याचा वापर करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले. पारदर्शक पध्दतीने पत्रकारिता करणे म्हणजे एखाद्या माणसाच्या व्यक्तिगत जीवनात अतीक्रमण करणे नव्हे. पत्रकारांकडून हा प्रकार अपेक्षित नसल्याचे राऊत यांनी सांगितले. माहिती खात्याचे मंत्री मिलींद नाईक यांनीही राऊत यांनी मांडलेला आंतरिक शुध्दतेचा मुद्दा महत्वाचा असल्याचे सांगून पत्रकारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आश्‍वासन दिले. त्यांच्या हस्ते शरद नाईक, गंगाराम महांबरे, शेख जमालुद्दीन व उमेश बाणस्तारकर यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकारही पारदर्शक असण्याची  जनतेची अपेक्षा : पवनकुमार
माहिती सचिव पवनकुमार सैन यांनी कार्यक्रमास पत्रकारांची कमी उपस्थिती असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रशासनात जशी पारदर्शकता आवश्यक असते, त्याच पध्दतीने पत्रकारही पारदर्शक असावा, अशी जनतेची अपेक्षा असते, असेही त्यांनी सांगितले. ‘गुज’चे अध्यक्ष किशोर नाईक गांवकर यांनी पत्रकारांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करताना काही व्यवस्थापनांच्या मागणीमुळे पत्रकारांना मर्यादेच्या सीमा ओलांडाव्या लागत असल्याचे सांगितले. पत्रकारांसाठी गृह योजना तयार करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील ८० टक्के मराठी पत्रकारिता सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागातील मनुष्य बळावर अवलंबून आहे. गोव्यात खोल्यांचे भाडे महाग असल्याने त्यांना अडचण होत असल्याचे गांवकर यांनी सांगितले. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांनी एडिटर गिल्डचे प्रतिनिधी या नात्याने प्रमुख पाहुणे राऊत यांचा परिचय करून दिला. माहिती संचालक अरविंद बुगडे यांनी स्वागत केले. माहिती अधिकारी शाम गांवकर यांनी सूत्रसंचालन केले.