पाच पालिकांसाठी एकूण ४३७ उमेदवारी अर्ज

0
144

राज्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आणखी ११३ जणांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केले असून आत्तापर्यंत ४३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज गुरुवार दि. ८ एप्रिल २०२१ ही अंतिम तारीख आहे.
राज्यातील मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आज आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. म्हापसा पालिकेत आत्तापर्यंत ९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मडगाव पालिकेत १०१ उमेदवारी अर्ज, मुरगाव पालिकेत १३०, केपे ६८ आणि सांगे पालिकेत ४४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पोटनिवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल
दोन ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी आत्तापर्यंत एकूण ८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वण कारापूर पंचायतीच्या प्रभाग २ मध्ये ४ आणि वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग ४ मध्ये ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.