Home Featured पाच दिवसांसाठी युद्धविराम जाहीर

पाच दिवसांसाठी युद्धविराम जाहीर

0

>> इराणशी चर्चेनंतर निर्णय; आणखी आठवडाभर चर्चा चालणार; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; इराणकडून दुजोरा नाही

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल मोठी घोषणा केली. इराणवरील लष्करी हल्ले 5 दिवसांसाठी तात्पुरते थांबवण्यात आले असून, पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला; मात्र इराणने या दाव्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली असून, युद्ध स्थगितीचे आदेश दिले, असे अफगाणिस्तानमधील इराणच्या दूतावासाने म्हटले आहे. युद्धाला सुरुवात होऊन 24 दिवस उलटल्यानंतर काल 5 दिवसांसाठी हा युद्धविराम जाहीर झाला आहे.

विशेष म्हणजे, या घोषणेच्या एक दिवस आधीच ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत कडक इशारा दिला होता. इराणने 48 तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले केले जातील, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र आता चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करत अमेरिकेने इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी तात्पुरते थांबवले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील एक आठवडा ही चर्चा सुरू राहणार आहे. मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. तसेच, मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांच्या मते, इराणसोबत सुरू असलेल्या संवादाची सकारात्मक दिशा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू झाल्यामुळे संपूर्ण युद्धविरामाची शक्यता निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय पुढील चर्चेनंतरच घेतला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांच्या मते, जर चर्चा यशस्वी झाली तर मध्यपूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो, अन्यथा पुन्हा लष्करी कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.

इराणच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांची माघार
अमेरिकेने इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला केला, तर इराण संपूर्ण प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करेल. या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेतली आणि त्यांनी हा हल्ला पुढे ढकलण्याचे आदेश दिल्याचे जाहीर केले, असे अफगाणिस्तानातील इराणच्या दूतावासाने म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या आधीच्या इशाऱ्याला इराणनेही जशास तसे उत्तर दिले होते. आपल्या पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला झाल्यास संपूर्ण प्रदेशात त्याचे तीव्र पडसाद उमटतील आणि प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला होता.

आमच्या इशाऱ्यामुळे अमेरिका घाबरली : इराण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या वक्तव्यावर इराणने जोरदार पलटवार केला आहे. अमेरिका आमच्या इशाऱ्यामुळे घाबरली आणि त्यांनी आपली योजना बदलली. इराणच्या अफगाणिस्तानातील दूतावासाच्या म्हणण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला स्थगित करण्याचे आदेश दिले. इराणने हे स्पष्ट केले होते की, जर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर ते संपूर्ण प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील. एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने म्हटले आहे की, ‘इराणकडून कडक इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मागे हटले.’