पाकिस्तानला हवीय लेखी हमी

0
112

भारतात नियोजित विश्वचषक स्पर्धांत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाच्या सहभागासाठी भारत सरकारकडून लेखी स्वरूपात हमी देण्याची मागणी केली आहे. व्हिसा संदर्भात कोणतीच अडचण न यावी यासाठी लिखित भारत सरकारकडून आश्वासन देण्यात यावे, असे पीसीबीचे म्हणणे आहे.
भारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांंत पाकिस्तानी संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी त्यांनी आयसीसीकडे स्पर्धेपूर्वी बीसीसीआयकडून त्यांच्या खेळाडूंना व्हिसा देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशी हमी लेखी स्वरूपात देण्याची मागणी केलेली आहे.

ऑस्ट्रेलियातील नियोजित टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जवळ जवळ रद्द होण्याच्याच मार्गावर आहे. भारतात मात्र २०२१मध्ये टी-२० विश्वचषक होणार हे निश्‍चित आहे. त्यानंतर २०२३मध्ये भारतात पुन्हा वनडे विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी आम्ही आयसीसी बीसीसीआयकडून खेळाडूंना व्हिसा आणि परवानगी मिळण्यासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही असे लेखी आश्‍वासन देण्याबाबत सांगितले आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसिम खान यांनी एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पीसीबीची बाजू मांडताना दिली आहे.
आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानला भारतात जायचे आहे. त्यामुळे खेळाडू व अधिकार्‍यांच्या सुरक्षेबाबत पूर्ण आश्वासन मिळाल्यानंतरच पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेसाठी भारतात जाईल, असेही खान यांनी स्पष्ट केले.

बीसीसीआय बरोबर आमचे चांगले संबंध आहेत. परंतु आम्हाला हे माहीत आहे की भविष्यात दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका होणे अशक्य आहे, असेही खान यांनी स्पष्ट केले.

पुढील महिन्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयसीसी अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला तर पीसीबीचे काय भूमिका असेल असे विचारले असता खान यांनी गांगुली किंवा इंग्लंडच्या कोलिन ग्रीव्हज यांच्यासह कोणत्याही उमेदवाराने ते या पदासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केलेले नाही आहे. आम्हाला मिश्र संकेत मिळत आहेत आणि गांगुली आयसीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा निर्णय घेणार की नाही हे माहिती नाही, असे खान यांनी सांगितले.