विस्ताराचे वास्तव काय?

0
158

राज्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या येत्या दोन दिवसांत हजाराचा टप्पा पार करील. इतर राज्यांप्रमाणे कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवत नेण्याऐवजी राज्य सरकारने ते खाली आणले, तरीही कोरोनाचा चढता आलेख काही खाली येऊ शकलेला नाही. दिल्ली आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी आता संपूर्ण जनतेच्या कोविड चाचण्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अवघ्या चौदा लाख लोकसंख्येचे आपण मात्र रुग्णसंख्या जरा वाढताच हात वर करून बसलो. दिल्लीमध्ये सध्या ६२ हजार कोविड रुग्ण आहेत. तब्बल २६१ कंटेनमेंट झोन आहेत, परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी दिल्ली सरकारने येत्या सहा जुलैपर्यंत घरोघरी कोविड चाचण्या करण्याची महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. आंध्र प्रदेशसारख्या राज्याने देखील ग्रामस्वयंसेवकांच्या मदतीने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. शेजारच्या कर्नाटकने आणि केरळने तर कोविडवर मात करण्याच्या दिशेने मोठे यश मिळवलेले दिसते आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असूनही तेथील सरकार निर्धारपूर्वक त्याच्याशी लढताना दिसते आहे.
खरे तर आपण राज्यामध्ये पहिल्याच टप्प्यात घरोघरी आरोग्य सर्वेक्षण केले होते, परंतु त्याचा फायदा घेऊन सर्व संशयित रुग्णांच्या तत्पर चाचण्या करून कोरोनाला तेथेच अटकाव करणे मात्र आपल्याला जमले नाही. ते आरोग्य सर्वेक्षण हा निव्वळ एक सोपस्कार बनून राहिला. देशात राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक कोविड चाचण्या आपण करीत असल्याचे सरकार सांगत होते, परंतु रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागताच या रणनीतीची पार दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. कंटेनमेंट झोनमध्येच कोरोनाला थोपवून धरणेही आपल्याला जमले नाही.
परिणामी, या जून महिन्यामध्ये बघता बघता गोव्याच्या सर्व तालुक्यांमध्ये कोरोना जाऊन पोहोचला. एकही तालुका आता त्याला अपवाद उरलेला नाही. सरकारने आयसोलेटेड केसेस कुठे कुठे सापडल्या, त्याचा मोघम तपशील दिला आहे, परंतु मांगूरशी संबंधित जे इतर २०५ रुग्ण आहेत, ते गोव्याच्या कोणकोणत्या भागात सापडले आहेत त्याचा तपशील आरोग्य खात्याने अद्याप दिलेला नाही. ती माहिती सरकारने जाहीर करावी म्हणजे कोरोनाच्या राज्यातील प्रसाराची वस्तुस्थिती कळू शकेल.
सुरवातीला ही जी कोरोना प्रकरणे गोव्याच्या खेडोपाडी सापडू लागली, त्यांचा मांगूरशी धागा जोडला जाऊ लागला. मात्र आता जे रुग्ण तालुक्या – तालुक्यांतून सापडत आहेत, त्यांचा संबंध मांगूरशी जोडता येत नसल्याने ‘आयसोलेटेड केसेस’ च्या नावाखाली त्यांना वेगळे काढणे भाग पडले आहे. यांना कोरोना संसर्ग झाला कुठून आणि कसा याचे उत्तर कोणापाशी नाही. म्हणजेच याचा अर्थ राज्य कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाच्या दिशेने पावले टाकते आहे. याला अटकाव करण्याचे तत्पर प्रयत्न झाले नाहीत तर परिस्थिती आज आहे त्याहून चिंताजनक बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्याच्या तुलनेत राज्यात जून महिन्यामध्ये कोरोनाने कहर मांडला. आता जुलैमध्ये काय वाढून ठेवले आहे याबाबत जनता नक्कीच सचिंत आहे.
कोविड योद्धे आघाडीवर निर्धाराने लढत आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढलेले दिसते. अर्थात लक्षणविरहित रुग्णांची चाचणी न करताच त्यांना घरी पाठवा असे फर्मान केंद्र सरकारने काढलेले आहे, त्याची ही परिणती आहे. रुग्णसंख्या कमी दाखवण्याच्या नादात लक्षणविरहित रुग्णांना लगोलग घरी पाठवले गेले, तरी दिवसागणिक नवे रुग्ण सापडणे काही थांबताना दिसत नाही. रोज सरासरी किमान तीस – पस्तीस नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये जाणवणारी एक गंभीर बाब म्हणजे या नव्या रुग्णांसंदर्भात ज्या तत्परतेने आरोग्य खात्याकडून हालचाली व्हायला हव्यात, त्या होत नाहीत अशी एक तक्रार गेले काही दिवस सातत्याने ऐकू येते आहे. त्यासंदर्भात जी उदाहरणे समोर आली आहेत, ती काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात. कोरोना रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली असता त्या कमालीच्या उशिरा येण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. मोर्लेपासून मडगावपर्यंतच्या या तक्रारींच्या वस्तुस्थितीची शहानिशा आरोग्यमंत्र्यांनी जातीने केली पाहिजे आणि असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत हे पाहिले पाहिजे. दुसरी जाणवणारी बाब म्हणजे नव्याने आढळणार्‍या कोरोना रुग्णांची रवानगी थेट कोविड केंद्रात अथवा कोविड इस्पितळात होण्याऐवजी आधी त्यांना स्थानिक इस्पितळांमध्ये दाखल करण्याचे प्रकार नागरिकांकडून घडत आहेत. मोर्ले येथील एका कोरोनाग्रस्त कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा नुकताच बळी गेला. त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त आहे हे ठाऊक असून देखील त्याला आधी साखळीच्या इस्पितळात, नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या प्रक्रियेमध्ये त्या दोन्ही इस्पितळांतील डॉक्टर आणि कर्मचारी अकारण त्या रुग्णाच्या संपर्कात आले. गोमेकॉतील कॅज्युअल्टी विभागातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना पीपीई पोशाख देखील नसल्याचे वृत्त आहे. कळंगुटला कोविड केंद्रात पाठवण्यात आलेल्या रुग्णांची जागा नसल्याच्या कारणाने परतपाठवणी झाल्याचीही एक तक्रार ऐकू आली. या अशा प्रकारच्या बेपर्वाईला पायबंद बसल्याखेरीज कोरोनाचा कहर काही आपल्याला रोखता येणार नाही. कोविड रुग्णांच्या हाताळणीबाबत अधिक तत्परता दिसली पाहिजे आणि त्यासाठी या रुग्ण हाताळणीचे केंद्रीय व्यवस्थापन आरोग्य खात्याकडून तातडीने झाले पाहिजे.
जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद्या रुग्णामध्ये जेव्हा कोरोनाची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसतात, तेव्हा त्याला नजीकच्या कोविड केअर केंद्रात लगोलग नेण्याची तत्पर व्यवस्था आरोग्य खात्याने करायला नको? मोर्लेपासून मडगावपर्यंतच्या प्रकरणांत गेल्या काही दिवसांत त्याबाबत जी अक्षम्य हलगर्जी दिसून आली आहे ती घातक आहे. यातून कोरोनाला अटकाव होण्याऐवजी अधिक प्रसार होण्याची शक्यता बळावते. ‘आयसोलेटेड केसेस’ म्हणून नवी प्रकरणे निकालात न काढता त्यांचे स्त्रोत आणि संपर्क हे दोन्ही शोधणे या घडीस नितांत गरजेचे आहे.