पाकिस्तानचा मालिका विजय

0
149

तिसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी व ८ चेंडू राखून पराभव करत पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. द. आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले १६५ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १८.४ षटकांत ६ गडी गमावून गाठले. मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेेने जिंकत मालिकेत रंगत निर्माण केली होती.
प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेची ७ बाद ६५ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. डावखुरा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याने केवळ ४५ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ८५ धावा चोपत संघाला सन्मानजनक मजल मारून दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखत ३० चेंडूंत ४२ धावा केल्या. पहिल्या दोन्ही सामन्यातील अपयश मागे टाकत कर्णधार बाबर आझम याने ३० चेंडूंत ४४ धावा केल्या. नवाझने ११ चेंडूंत नाबाद १८ व हसन अलीने केवळ ७ चेंडूंत नाबाद २० धावा करत संघाला विजयी केले. गोलंदाजीत २ षटकांत १३ धावा देत २ बळी तसेच फलंदाजीत चमक दाखवलेला मोहम्मद नवाझ सामनावीर व तीन सामन्यांत ९८.५च्या सरासरीने १९७ धावा केलेला मोहम्मद रिझवान मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.