टीम इंडिया २४९ धावांनी आघाडीवर

0
171

>> रविचंद्रन अश्‍विनचे पाच बळी

>> पाहुण्या इंग्लंडचा १३४ धावांत खुर्दा

रविचंद्रन अश्‍विन याने कसोटी क्रिकेटमध्ये २९व्या वेळेस डावात घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १३४ धावांत गुंडाळताना पहिल्या डावाच्या आधारे १९५ धावांची विशाल आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात १ बाद ५४ धावा करत भारतानेेेेेेेेेे आपली आघाडी २४९ धावांपर्यंत फुगवली आहे.

पहिल्या दिवसाच्या ६ बाद ३०० धावांवरून काल पुढे खेळताना भारताला केवळ २९ धावांची भार घालता आली. ऋषभ पंत याने आपले सहावे कसोटी अर्धशतक लगावले. ५८ धावांवर तो नाबाद राहिला. इंग्लंडकडून ऑफस्पिनर मोईन अली सर्वांत यशस्वी ठरला. परंतु, यासाठी त्याला १२८ धावा मोजाव्या लागल्या.

धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. इशांतने सलामीवीर बर्न्सला भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर सिबलीविरुद्धचे झेलबादचे अपील पंचांनी फेटाळल्यानंतर भारताने रिव्ह्यूचा वापर करत त्याला तंबूत पाठवले. ज्यो रुटचा महत्त्वाचा बळी पदार्पणवीर अक्षर पटेलले मिळविला. पहिल्या कसोटीत रुटने यशस्वीपणे वापरलेले ‘स्वीप’चे अस्त्र यावेळी त्याच्या पतनास कारणीभूत ठरले. पटेलचा चेंडू स्वीप करण्याच्या नादात बॅटच्या बाहेरील कडेला लागून चेंडू हवेत उडाल्यानंतर अश्‍विनने सोपा झेल घेतला. यावेळी इंग्लंडचा संघ ३ बाद २३ असा संकटात सापडला. यानंतर त्यांचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. यष्टिरक्षक फलंदाज बेन फोक्स याने नाबाद ४२ धावा करत संघाला शतकी वेस ओलांडून दिली. भारताने दुसर्‍या डावात शुभमन गिल याला गमावले. लिचने त्याला तंबूची वाट दाखवली.

धावफलक
भारत पहिला डाव (६ बाद ३०० वरून) ः ऋषभ पंत नाबाद ५८, अक्षर पटेल यष्टिचीत फोक्स गो. अली ५, इशांत शर्मा झे. बर्न्स गो. अली ०, कुलदीप यादव झे. फोक्स गो. स्टोन ०, मोहम्मद सिराज झे. फोक्स गो. स्टोन ४, अवांतर ०, एकूण ९५.५ षटकांत सर्वबाद ३२९
गोलंदाजी ः स्टुअर्ट ब्रॉड ११-२-३७-०, ओली स्टोन १५.५-५-४७-३, जॅक लिच २७-३-७८-२, बेन स्टोक्स २-०-१६-०, मोईन अली २९-३-१२८-४, ज्यो रुट ११-३-२३-१
इंग्लंड पहिला डाव ः रॉरी बर्न्स पायचीत गो. इशांत ०, डॉम सिबली झे. कोहली गो. अश्‍विन १६, डॅन लॉरेन्स झे. गिल गो. अश्‍विन ९, ज्यो रुट झे. अश्‍विन गो. अक्षर ६, बेन स्टोक्स त्रि. गो. अश्‍विन १८, ओली पोप झे. पंत गो. सिराज २२, बेन फोक्स नाबाद ४२, मोईन अली झे. रहाणे गो. पटेल ६, ओली स्टोन झे. रोहित गो. अश्‍विन १, जॅक लिच झे. पंत गो.इशांत ५, स्टुअर्ट ब्रॉड त्रि. गो. अश्‍विन ०, अवांतर ९, एकूण ५९.५ षटकांत सर्वबाद १३४

गोलंदाजी ः इशांत शर्मा ५-१-२२-२, रविचंद्रन अश्‍विन २३.५-४-४३-५, अक्षर पटेल २०-३-४०-२, कुलदीप यादव ६-१-१६-०, मोहम्मद सिराज ५-४-५-१
भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा नाबाद २५, शुभमन गिल पायचीत गो. लिच १४, चेतेश्‍वर पुजारा नाबाद ७, अवांतर ८, एकूण १८ षटकांत १ बाद ५४
गोलंदाजी ः ओली स्टोन २-०-८-०, जॅक लिच ९-२-१९-१, मोईन अली ७-२-१९-०