Home Featured पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ठार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ठार

0

भारतीय लष्कराचे श्रीनगरमधील लिडवास परिसरात ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी

आणखी दोन दहशतवाद्यांचाही खात्मा; शस्त्रे जप्त; ओळख पटवण्याचे काम सुरू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 97 दिवसांनंतर अखेर भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरमधील लिडवास परिसरात प्रत्युत्तरात्मक कारवाई करत काल तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाशिम मुसा याला यमसदनी धाडण्यात भारतीय जवानांना यश आले. हाशिम मुसा हा लश्कर-ए-तोयबा (एलईटी) चा एक मुख्य कमांडर होता आणि पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. उर्वरित अन्य दोघा दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे दहशतवादी तिथून पसार झाल्याने त्यांचा शोध घेणे हे लष्करासाठी फार मोठे आव्हान बनले होते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना हुलकावणी देत असलेले हे दहशतवादी अखेर काल सुरक्षा दलांच्या टप्प्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी चिनी अल्ट्रा कम्युनिकेशन सेट पुन्हा सक्रिय केला. यानंतरर आठवडाभरापूर्वी भारतीय सुरक्षा दलांना श्रीनगरच्या जंगलात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली. काल सकाळी 11:30 च्या सुमारास, 24 राष्ट्रीय रायफल्स आणि 4 पॅरा युनिटच्या सैनिकांच्या तुकडीने प्रगत उपकरणांचा वापर करून दहशतवाद्यांचे ठिकाण शोधून काढले आणि तिथे उपस्थित असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.

दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीचे एम-4 कार्बाइन, एके-47, 17 रायफल ग्रेनेड सापडले आहेत. याशिवाय, इतर अनेक संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत.वृत्तसंस्था पीटीआयनुसार, मारला गेलेला एक दहशतवादी हा हाशिम मुसा होता, याची पुष्टी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. इतर दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा 2024 मध्ये सोनमर्ग बोगदा प्रकल्पावरील हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.