पहलगामजवळील बैसरान येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाशीम मुसा ऊर्फ सुलेमान हा लष्कराच्या एका संयुक्त कारवाईत दोघा साथीदारांसह मारला गेल्याच्या बातम्या काल आल्या. एकीकडे संसदेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असतानाच पहलगाम हल्ल्याचा गेल्या 22 एप्रिलपासून न सापडलेला सूत्रधार आणि त्याचे दोन साथीदार एकाएकी सापडून मारले जाणे ह्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. परंतु दाचिगामच्या घनदाट जंगलामध्ये तीन दहशतवादी लष्कराच्या ह्या संयुक्त कारवाईत ठार झाले आहेत. काल संसदेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात जोरदार घमासान झाले. तशी ती वादळी चर्चा होणार ही अपेक्षाही होती. ह्या एकूण सैनिकी मोहिमेसंदर्भात दोन भूमिका दिसतात. एक भूमिका ह्या अत्यंत अभूतपूर्व, साहसी लष्करी मोहिमेच्या समर्थनार्थ उभी ठाकणारी आहे, तर विरोधक मात्र ह्या मोहिमेचे, त्यामागील धाडसाचे कौतुक करण्याऐवजी त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतात. पाकिस्तानने आपली किती विमाने पाडली? ही मोहीम कोणत्या दबावाखाली अचानक मागे घेतली गेली? पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तो हल्ला हे सुरक्षायंत्रणांचे अपयश नव्हते का? असे अनेक प्रश्न काल विरोधकांनी लोकसभेमध्ये उपस्थित केले. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी अड्ड्यांची आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांची उपग्रहाधारित छायाचित्रे आणि प्रत्यक्ष हल्ल्याचे व्हिडिओ सैन्यदलांनी त्याचवेळी जगापुढे ठेवले होते, त्यामुळे विरोधक किमान ही मोहीम अशा प्रकारे राबवली गेली हे मान्य तरी करीत आहेत. अन्यथा सर्जिकल स्ट्राईक्स किंवा बालाकोटप्रमाणे ह्या कारवाईच्या सत्यासत्यतेसंबंधीच शंका घ्यायलाही त्यांनी कमी केले नसते. आपली किती विमाने पाडली गेली हा प्रश्न विचारणाऱ्यांना परीक्षेत मिळालेले यश महत्त्वाचे की परीक्षेचा पेपर लिहिताना पेन, पेन्सील मोडली का हे महत्त्वाचे असा सवाल करीत संरक्षणमंत्री राजनाथसिंहांनी काल विरोधकांना ठणकावले. विरोधकांच्या वतीनेही प्रश्नांची सरबत्ती सरकारवर झाली. पहलगाम हल्ला मुळात झाला कसा, त्याला गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांची हलगर्जी कारणीभूत नव्हती का असा सवालही विरोधकांनी केला. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचे भाषण प्रभावी होते. पहलगामचे अपयश झाकण्यासाठी नायब राज्यपालांच्या मागे लपू नये, केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्या अपयशाची जबाबदारी घ्यावी असे गोगोई म्हणाले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतही सरकारवर तुटून पडताना काल दिसले. जो तो आपापल्या राजकीय भूमिकेप्रमाणे सोईस्करपणे मुद्दे मांडत होता. पहलगाम हल्ला आणि नंतरचे ऑपरेशन सिंदूर ह्या दोन्हीही विषयांवर दोन्ही प्रकारे मुद्दे मांडले जाऊ शकतात. हा दहशतवादी हल्ला रोखता का आला नाही असा सवाल करणारे आपल्या सरकारच्या राजवटीत महानगरी मुंबईवरील दहशतवादी हल्लाही रोखू शकले नव्हते हे सोईस्करपणे विसरतात. खरे म्हणजे अनपेक्षितता हेच कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचे ठळक वैशिष्ट्य असते. महासत्ता अमेरिकेला देखील विश्व व्यापार केंद्रावरील हल्ले रोखता आले नव्हते, कारण कोणी त्या स्वरूपाच्या हल्ल्याची तोवर अपेक्षाच केली नव्हती. त्यामुळे दहशतवादी हल्ला कसा झाला ह्यावर थयथयाट करण्यापेक्षा त्यानंतर त्याला प्रत्युत्तर कसे दिले गेले हे महत्त्वाचे नाही का, असे सत्ताधआरी म्हणत आहेत. देशावरच्या मोठमोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ पाकिस्तानला शाब्दिक इशारे देण्यापर्यंतच आपल्या आजवरच्या सरकारांची धाव होती. परिणामी आपल्या देशावर हरघडी नवनवे घाव घातले गेले. विद्यमान सरकारच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच ही नीती बदललेली दिसते आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची मुभा सैन्यदलांना मिळते आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय सैन्यदलांनी ह्या मिळालेल्या मुक्तहस्ताचा पुरेपूर वापर करीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना जन्माचा धडा शिकवला. त्यांची मुख्यालये आणि दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेले हल्ले यशस्वीपणे परतवून लावून त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त करताना त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेला निकामी केले. हा पराक्रम काहीच नाही का? राजकीय पक्षांनी ह्या सगळ्याचे निव्वळ राजकारण करण्यापेक्षा देशहिताच्या व्यापक नजरेतून ह्या मोहिमेकडे पाहावे. सत्ताधाऱ्यांनी सैन्यदलांनी केलेल्या पराक्रमाची शेखी मिरवू नये आणि विरोधकांनी सैन्यदलांच्या पराक्रमावर शंका घेऊ नये. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय श्रेयवादात पलीकडे पाकिस्तान येथे काय चालले आहे ह्याकडे टक लावून बसलेला आहे हे विसरून कसे चालेल?