पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीर हाय अलर्टवर आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दल राज्यातील वेगवेगळ्या भागात तीव्र शोध मोहीम राबवत आहे. आतापर्यंत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातच कठुआ जिल्ह्यात एका महिलेने चार संशयितांना पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि स्थानिक पोलिस संयुक्तपणे परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. महिलेने संशयितांना पाहिल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. ज्या ठिकाणी ही शोध मोहीम राबवली जात आहे, ती जागा आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळ आहे. या भागातून यापूर्वीही घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत.
याशिवाय उधमपूर जिल्ह्यातील जंगली भागात फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संरक्षण दलांकडून शोधमोहीम सुरू आहे. तसेच किश्तवाड, राजौरी आणि पूंछ या भागातही शोधमोहीम राबवली जात आहे. दुड्डू-बसंतगडमध्ये लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) विशेष दलांकडून शोधमोहीम सुरू आहे. या मोहिमेत हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख केली जात आहे.
दोन दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून 27 पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यात सामील आसिफ शेख आणि आदिल ठोकर या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरे काल जमीनदोस्त झाली. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई झाली. गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर होते, ते स्फोटात ध्वस्त झाले, तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. पहलगाममधील बैसरान खोऱ्यात हल्ला केल्यानंतर आसिफ आणि आदिल हे दोघेही फरार आहेत.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठार
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अल्ताफ लल्ली ठार झाला. या चकमकीत दोन भारतीय जवानही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.