अभिषेक बॅनर्जींनंतर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला
पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांवर लागोपाठ हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. तृणमूलचे सर्वेसर्वा आणि दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाने हल्ला केल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात हल्ला झाला. हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे ही घटना घडली.
खासदार कल्याण बॅनर्जी हे ‘श्रीरामपूर’ लोकसभा मतदारसंघातून 2009 पासून सलग चार वेळा निवडून आले आहेत. आपल्याच बालेकिल्ल्यात काल झालेल्या अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याण बॅनर्जी समर्थकांसह चंडीतला येथे आंदोलन करत होते. ते रस्त्यावरून पायी चालत जात असताना, अचानक मागून फेकलेली एक वस्तू त्यांच्या डोक्याला जोरदार आदळली. त्यांच्यावर मोठा दगड फेकण्यात आल्याचे नंतर समोर आले. हा घाव इतका गंभीर होता की कल्याण बॅनर्जी यांनी डोके पकडले आणि ते थेट रस्त्यावर कोसळले. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डागही दिसून आले.
यावेळी घटनास्थळी प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. कल्याण बॅनर्जी यांना पाहून काही आंदोलकांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या आणि त्यांना काळे झेंडेही दाखवले. आदल्या दिवशी अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या लागोपाठच्या घटनांमुळे पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.