गेल्या 13 ऑगस्टला पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवारांसमवेत झालेल्या बैठकीवरून शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत जो संशय व्यक्त केला जाऊ लागला होता, ज्या अटकळी व्यक्त केल्या जात होत्या आणि ज्या अफवा पसरवल्या जात होत्या, त्यांची काल बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान सभेमुळे तरी तूर्त इतिश्री व्हायला हरकत नसावी. मध्यंतरीच्या थोड्या उसंतीनंतर पवार पुन्हा मैदानात उतरल्याचे काल दिसून आले. गेल्या महिन्यात शरद पवारांची साथ सोडून भाजपात डेरेदाखल झालेल्या अजित पवारांसोबत त्यांची पुण्यात उद्योगपतीच्या घरी गुप्त बैठक झाल्याची बातमी बाहेर फुटताच नाना तर्कवितर्कांना ऊत आला होता. त्यातच पवारांना केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव भाजपने ठेवला असल्याचा तर्क काँग्रेस नेत्यांनी वर्तवल्याने, काही दिवसांपूर्वीच टिळक पुरस्कार सोहळ्यात नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठ भूषविणाऱ्या शरद पवारांच्या नव्या राजकीय भूमिकेबाबतचा संशय गडद झाला होता. स्वतः पवारांनी त्या बैठकीमागे काही राजकीय इरादा होता याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला, तरीही त्यांची एकंदर राजकीय वाटचाल माहीत असलेल्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनात नेमके काय चालले असेल याबाबतचे कुतूहल कायम होते. कुटुंबप्रमुख या नात्याने आपण पुतण्याला भेटलो असे पवार म्हणाले. मात्र, त्याच बरोबर आपण भाजपसोबत यावे असा प्रयत्न चालला असल्याचेही त्यांनी सूचित केले होते. पवार यांच्या भूमिकेकडे केवळ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचेच नव्हे, तर केंद्रात नव्याने उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीचेही लक्ष लागून राहिले होते. शिवसेनेमध्ये उभी फूट पाडण्यात आणि परिणामी त्या पक्षाचा आजवरचा सगळा दरारा संपुष्टात आणण्यात यश आलेल्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंड घडवल्याने त्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील भीष्म पितामह गणल्या जाणाऱ्या शरद पवारांची सर्व प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशा वेळी तेही भाजपपुढे सपशेल शरणागती पत्करून आपल्या आजवरच्या पुण्याईवर पाणी सोडणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच वर उल्लेखलेल्या घटनाक्रमामुळे हा संशय अधिक बळावत चालला होता. नाना प्रकारच्या अफवांद्वारे त्यात भरही घातली जात होती. त्यामुळे पवारांचा भरवसा धरावा की नाही या पेचात त्यांचे मित्रपक्ष सापडले होते आणि अजित पवारांसोबत भाजपात न जाता पवारांसोबत राहिलेले निष्ठावंतही गोंधळात पडले होते. महाविकास आघाडीने तर राष्ट्रवादीची वाट न पाहता लोकसभेच्या जागावाटपाची बोलणीही सुरू करण्याचा विचार चालवला होता, परंतु कालच्या बीडच्या सभेमध्ये मोदींच्या राजवटीवर त्यांनी जो कडाडून हल्ला चढवला तो पाहिला, तर पवारांच्या राजकीय भूमिकेत बदल झालेला नाही वा होण्याची शक्यता नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रातील सरकार जात, धर्म, भाषा यांच्या आधारावर समाजात अंतर निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी कालच्या सभेत भाजपवर केला व जनता पुढच्या निवडणुकीत जागा दाखवील अशीही गर्जना केली. आपल्या पक्षात उभी फूट पाडून आपल्या नेतृत्वाच्या आणि आजवरच्या राजकीय कारकिर्दीच्या अब्रूची लक्तरेच पक्षात फूट पाडून भाजपाने वेशीवर टांगल्याने पवार बिथरले आहेत आणि कंबर कसून मैदानात उतरलेले आहेत. सर्व विरोधी पक्षांची राष्ट्रीय स्तरावर एकजूट निर्माण करून भाजपला संघटितपणे शह देण्याची जी रणनीती आखण्याचा मनसुबा सर्वच विरोधी पक्षनेते व्यक्त करीत आले होते, त्या त्यांच्या स्वप्नाला साकारण्याच्या दिशेने एकेकाळचे भाजपचे साथी संयुक्त जनता दलाचे नेेते व बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनीच पहिले पाऊल टाकले आणि हो ना करता करता त्यात काँग्रेससह बहुतेक प्रमुख पक्ष सामील झाले. कुंपणावरच्या पक्षांची भूमिका अलाहिदा, परंतु भाजपला शह देण्यासाठी एकत्र आल्यावाचून गत्यंतर उरलेले नाही या भावनेतून हे जे पक्ष एकत्र आले आहेत, त्यांच्यासाठी शरद पवारांसारखा भीष्मपितामह आपला नेता म्हणून जरी नको असला, तरी पाठीराखा म्हणून निश्चित हवा आहे. त्यामुळे गजलकार सुरेश भटांच्या शब्दांत सांगायचे तर ‘करू नका एवढ्यात चिंता पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही’ असे म्हणत शरद पवार वयाच्या 82 व्या वर्षी आतापावेतो महाबलाढ्य बनलेल्या भाजपशी दोन हात करायला मैदानात उतरले आहेत. आता त्यांच्यासाठी ही लढाई वैचारिक लढ्यापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेची अधिक बनलेली आहे. ‘माझं वय झालं असलं तरी तुम्ही माझं अजून काय बघितलंय?’ म्हणत त्यांनी आपल्या सक्रियतेचे जे संकेत कालच्या सभेत दिले, त्याचे काय परिणाम किमान महाराष्ट्रात दिसतात यावर यापुढील काळात नजर ठेवावी लागेल.