पर्वरी शहराच्या नामकरणावरून वादंग

0
43

पर्वरीचे ‘नवी पणजी’ असे नामकरण करायला हवे, असे विधान करून पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी काल नव्या वादाला तोंड फोडले. पर्वरीचा झपाट्याने विस्तार व्हायला लागला असून, पणजीतील कित्येक सरकारी कार्यालये आता पर्वरीत हलवण्यात आली आहेत.

राज्य विधानसभा प्रकल्प तसेच उच्च न्यायालय देखील पर्वरी येथे हलवण्यात आले आहे. लवकरच आणखी काही सरकारी कार्यालये तेथे हलवण्यात येणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर पर्वरीचा ‘नवी पणजी’ म्हणून विकास करायला हवा, असे गुदिन्हो यांनी गोवा गृहनिर्माण मंडळाच्या नव्या बाजार प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी या प्रस्तावाला हरकत घेत विरोध दर्शवल्याने आता पर्वरीच्या नामकरणाच्या प्रस्तावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.