पर्वत

0
28
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

जंगली माणसांपेक्षा शहरातील सुधारलेल्या माणसांचा स्वार्थ पर्वताचे नुकसान करत असतो. पर्वतावरील वनस्पतीधन व प्राणीधन चोरणारी शहरी माणसेच प्रामुख्याने असतात. जंगली माणूस गरीब असला तरी प्रामाणिक असतो. पोराबाळांचे पोट भरण्यापलीकडे विशेष धनाची त्याला अपेक्षा नसते.

आपल्या नावाला साजेशा उंचीचा पर्वत असतो. पृथ्वीवर लहान-मोठे डोंगर खूप आहेत. पृथ्वी निर्माण होतानाच थोडे उंचवटे, थोड्या दर्‍या, थोडी मैदाने, थोडा खोलगटपणा अशा विविधतेची रचना निर्माण झाली.

हिमालय पर्वताची उंची पाहून आपण त्याला पर्वत म्हणू शकतो; बाकी कमी उंचीच्या डोंगरांनीदेखील पर्वत नाव धारण केले आहे. सह्याद्री पर्वत, चंद्रनाथ पर्वत, सिद्धनाथ पर्वत हे तेवढ्या अपेक्षित उंचीचे नाहीत. लोकमानसाच्या तोंडातूनच त्यांना ‘पर्वत’ नाव दिले गेले. आल्प्स पर्वत शिखरे, फ्युजियामा पर्वत हे जगाचे वैभव नेहमीच गौरवले जाते.

पर्वत हा ध्यानस्थ बसलेला असतो. कित्येक खडक त्याच्यामध्ये सामावलेले असतात. त्या खडकांनीच त्याचा पाया मजबूत बनलेला असतो. रस्ते बनवताना कित्येक डोंगर कापले गेले; पण पर्वत कापणे हे काम सोपे नाही.
पर्वतामुळे वार्‍याची दिशा बदलते. वारे वाहत जातात आणि पर्वताच्या उंचीमुळे ते अडवले जातात. ढगांचेदेखील तसेच असते. वार्‍याच्या झोताबरोबर ते वाहत जातात. आणि बाष्पाने भरलेले काळे-काळे ढग जर असतील तर अडवले गेल्यावर त्यांचे द्रविभवन होते व तेथेच पाऊस पडला जातो.

डोंगराशी कोणी सहजपणे मुकाबला करू शकतो, पण पर्वताशी लढणे सोपे नाही. ज्यांनी-ज्यांनी पर्वतावर चढाई केली, त्यांना-त्यांना पराजयी होऊन मागे वळावे लागले आहे. पर्वताची जागा स्थिर असते. तो विरक्त असतो. तो संयमाने परिपूर्ण असतो. पर्वतावर राहणारे हिंस्र प्राणी, विविध वनस्पती तसेच टोळ्या-टोळ्यांनी राहणारा मानव-समूह या सगळ्यांचा पोशिंदा पर्वतच असतो. वाघ, सिंह, हत्ती, अस्वले, लांडगे या जंगली जनावरांबरोबर गाय, बैल, शेळ्या, बकर्‍या, मेंढरे, म्हशी अशी पाळीव जनावरे मानव-समूहाकडून सांभाळली जातात. जंगली हिंस्र जनावरांना तिथला माणूस त्रास देत नसतो. तो त्यांचा सोबती असल्यामुळे त्यांच्याशी मित्रत्व ठेवून राहत असतो. हिंस्र जनावरांकडून पाळीव प्राण्यांची शिकार होते, पण निसर्गाचा समतोल राखला जातो. पाळीव जनावरे थोडी संपली तरी त्यांची उत्पत्ती कमी होत नाही. एका बाजूने कमी झाली तरी दुसर्‍या बाजूने दुप्पट, तिप्पट वाढतच जाते.
हेच तर पर्वताचे वरदान आहे. पर्वत हा सगळ्यांचाच पोशिंदा आहे. त्याच्यासाठी कोणी मित्र नाही व कोणी शत्रू नाही. सगळ्यांसाठीच तो समान असतो.
पर्वतात राहणारे काही आदिवासी मानव-समूह आहेत. त्यांच्यापर्यंत रस्ते गेले नाहीत. शाळा, रुग्णालये, वीज, नळ अशा आधुनिक सुखसोयी तिथपर्यंत पोचलेल्या नाहीत. शतकानुशतके ते मागासलेलेच राहिले.

जंगलात मिळणारे मध गोळा करून विकणे, औषधी वनस्पतींचे चार पैसे मिळवणे, पोट भरण्यासाठी लाकडे विकणे हे सगळे त्यांना चोरमार्गाने करावे लागते. कारण सरकारने पर्वताचे मोजमाप घेतलेले असते आणि सगळी वनसंपदा सरकारी बनलेली असते. जंगलामध्ये राहणार्‍या माणसांनादेखील सरकारी योजनांमुळे त्रास सहन करावा लागतो. कारण त्यांच्या वस्त्यांपर्यंत राखीव जंगलाचे कायदे पोहोचलेले असतात. त्यामुळे त्यांच्या दैनिक व्यवहारांना अडथळा पोहोचतो. सरकारी कुंपण-बंदिस्त लागवडीमुळे गुरांना चरण्यासदेखील जागा मिळत नाही.

जंगली माणसांपेक्षा शहरातील सुधारलेल्या माणसांचा स्वार्थ पर्वताचे नुकसान करत असतो. पर्वतावरील वनस्पतीधन व प्राणीधन चोरणारी शहरी माणसेच प्रामुख्याने असतात. त्यांचे सरकारी वनरक्षकांशी हितसंबंध असतात. जंगली माणूस गरीब असला तरी प्रामाणिक असतो. पोराबाळांचे पोट भरण्यापलीकडे विशेष धनाची त्याला अपेक्षा नसते. धनसंग्रहाचा तर प्रश्‍नच येत नाही. पण शहरांमध्ये व नगरांमध्ये राहणार्‍या माणसांच्या स्वार्थाला मर्यादाच नसते. बँकांमधील खात्यांमध्ये पैशांच्या राशी उभ्या करण्याकडे त्यांच्या चढाओढी लागलेल्या असतात. त्यामुळे पर्वताला या मानवी स्वार्थाच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागते. कधी खडक पळवले जातात, तर कधी माती चोरली जाते.

पर्वतांमध्ये काही प्राचीन गुहा असतात. त्यांची काही खास वैशिष्ट्ये असतात आणि इतिहासदेखील असतो. काही गुहांमध्ये वाघ-सिंहासारखी हिंस्र जनावरे राहतात, तर काही गुहांमध्ये देव-देवतांची प्रार्थनास्थळे असतात. दगडाला देव मानणारी आपली संस्कृती आहे. काही दगडांना शेंदूर फासून त्यांची पारंपरिक पूजा केली जाते. सगळा जंगली मानव-समूह त्या पूजेमध्ये सामील होतो. त्यांच्यापुरती ती एक वार्षिक जत्राच असते. अशी कित्येक प्रार्थनास्थळे पर्वतामध्ये सामावलेली आहेत. औषधी पाण्याचे झरे व तळी अधूनमधून विखुरलेली असतात.

पर्वतातील लोकसंस्कृती आगळी-वेगळी असते. लोककलांचे तिथे अस्तित्व असते. त्यांच्या जीवनाची विशेष शैली असते. जिथे सपाट जागा सापडते तिथे शेती करून धान्य पिकवण्याचे कौशल्य त्यांनी साधलेले असते. कोणत्या कडे-कपारीत कोणते पीक काढावे याचे अचूक ज्ञान त्यांच्यापाशी असते. वृत्ती कष्टाळू असते. नव्या संस्कृतीचा सहवास त्यांना लाभलेला नसतो. त्यामुळे प्राचीन जीवनपद्धतीचा अभिमान त्यांनी बाळगलेला असतो.

पर्वत ही देणगी निसर्गानेच दिली आहे. हे पर्वत आहे तसेच ठेवणे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासारखे आहे. या पर्वतांनीच आपली संस्कृती सांभाळलेली आहे, परकीय आक्रमणापासून आपल्या धर्माचे रक्षण केले आहे. मानवी संस्कृतीचा सहस्रो वर्षांचा इतिहास जर पाहिला तर पर्वतावर आक्रमण करणे परकीयांना सोपे गेले नाही. सपाट प्रदेशांमध्ये व मैदानी भागांमध्ये त्यांची आक्रमणे वारंवार झाली. आपल्या मंदिरांचा विद्ध्वंस करण्यात आला. देवस्थळे बाटवण्यात आली. सक्तीची धर्मांतरे घडवली गेली. या सगळ्या धामधुमीत पर्वतावरील जन-समूह वाचला. कारण तिथपर्यंत जाण्याचे परकीयांना धाडस झाले नाही. जे त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांचा प्राचीन टोळ्यांनी असा प्रतिकार केला की त्यांना सळो की पळो करून सोडले. म्हणूनच म्हणावेसे वाटते की पर्वतानेच आपला धर्म आणि देव राखला.

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये पर्वतांची स्तुती केली गेली आहे आणि सृष्टीचा सांभाळ करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे.
पर्वतच आपला खरा राखणदार आणि युगायुगांचा रक्षणकर्ता आहे. पर्वत हा अचल, अटळ, अमर असा महासेनापती आहे. अशा या कीर्तिवंत पर्वताला आमचे शतशः प्रणाम!