पर्यावरण संवर्धनाच्या विचारानेच राज्यात उद्योग आणणार

0
99

नव्या प्रकल्पांची गरज : पार्सेकर
आपण पर्यावरणप्रेमी आहे. मुख्यमंत्री बनलो तरी माझ्या मानसिकतेत बदल झालेला नाही. राज्यात नोकर्‍यांच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. त्यासाठी नवे औद्योगिक प्रकल्प येण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार करूनच आपले सरकार गोव्यात उद्योग आणणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. कायद्यावर बोट ठेवून प्रत्येक प्रकल्पाला विरोध केल्यास राज्य चालविणे शक्य होणार नाही, असे पार्सेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या सहकार्याने विज्ञान आणि पर्यावरण मंडळाने पर्यावरणाच्या संवर्धनाच्या बाबतीत प्रसारमाध्यमाची भूमिका या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते. आपल्या मतदारसंघातील एका पुलाच्या रस्त्यासाठी ९ माड तोडावे लागले. ते तोडताना माझ्याने पहावले नाही असे असले तरी विकासासाठी नाईलाजाने वृक्ष तोडावे लागतात, असे ते म्हणाले. अन्य प्राणीमात्राच्या तुलनेत माणूस हा महत्वकांक्षी असतो. आपल्या गरजा भागविण्यासाठी तो सतत प्रगती करतो. या गरजा थांबविणे शक्य नाही. प्रत्येक बाबतीत तारतम्य ठेवून विकास केल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार प्रधान प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नाना विरोध करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
गोव्यात पर्यावरणप्रेमी टोकाची भूमिका घेतात, असा संदेश गेल्यास गोव्यात उद्योग येणार नाहीत याचाही विचार व्हावा, अशी सूचना पार्सेकर यांनी केली.