‘स्पाईस जेट’ची उड्डाणे रोखल्याने ‘दाबोळी’वर ६०० प्रवासी अडकले

0
94
स्पाईस जेटची उड्डाणे रद्द झाल्यामुळे या कंपनीची तिकीटे घेतलेल्या प्रवाशांनी संबंधित काउंटरवर अशी गर्दी केली (छाया : प्रदीप नाईक)

आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या ‘स्पाईस जेट’ या विमान कंपनीला देशातील सर्वच विमानतळांवरून विमान उड्डाणास परवानगी नाकारल्याने दाबोळी विमानतळावरही या कंपनीची ८ विमाने रोखून धरण्यात आली. त्यामुळे सुमारे ६८० प्रवासी विमानतळावर अडकून पडल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांची अतिरिक्त फौज बंदोबस्तासाठी तैनात करावी लागली.काल सायंकाळी ४ वाजल्यापासून स्पाईस जेटचे एकही विमान देशातील अन्य विमानतळावरून दाबोळीत दाखल झाले नाही. परिणामी गोव्यातून देशातील अन्य ठिकाणी जाणारे प्रवासी एकामागोमाग विमानतळावर जमा झाल्याने विमानतळ परिरात जत्रेचे स्वरूप आले. स्पाईस जेटच्या विमानतळावरील काऊंटरवरून मुंबई-दिल्लीला जाणार्‍या काही प्रवाशांना बोर्डींग पास देऊन त्यांना विमानतळ आवारातील प्रवाशांच्या दालनात प्रवेश देण्यात आला. पण स्पाईस जेटची विमानेच नसल्याने प्रवासी वर्गात असंतोष पसरला. अन्य कंपन्याच्या विमानांचे प्रवासी जात असताना, स्पाईस जेटच्या प्रवाशांसाठी मात्र घोषणा होत नसल्याने अखेर सर्व प्रवाश्यांनी गोंधळ माजवायला प्रारंभ केला. प्रवासी बरेच चिडले होते. त्यांच्याकडून अनुचित घटना घडू नये यासाठी विमानतळावरील सीआयएसएफचे जवान आणि दाबोळी पोलिसांनी खबरदारी घेतली. या प्रवाशांवर नियंत्रणासाठी वास्को पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली.
दरम्यान, स्पाईस जेट कंपनीला इंधन पुरविणार्‍या कंपन्या नसून ते भारतीय विमानतळ प्राधिकरणाने थकबाकी भरल्याविना विमान उड्डाण करण्यास हरकत घेतल्याने या कंपनीची मोठी गोची झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्पाईस जेट कंपनी आर्थिक दिवाळखोरीत सापडल्याने कोट्यवधींची थकबाकी ते भारतीय विमानतळ प्राधिकरणाला तसेच तेल कंपनीनां देणे आहेत. याव्यतिरिक्त या कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना गेल्या ५-६ महिन्यांपासून वेतनही दिलेले नाही.
काल अचानक तेल कंपन्यांनी स्पाईस जेटला इंधन पुरविण्यास नकार दिल्याने सर्व विमानतळांवरील त्यांची विमाने अडून पडली. शिवाय भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही थकबाकी भरल्यानंतर विमान उड्डाणास परवानगी देण्याची भूमिका घेतल्याने स्पाईस जेट कंपनी अडचणीत सापडली. दरम्यान, प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागल्याने अनेक प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. स्पाईस जेटची विमाने बंद राहिल्याने इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीटांचे दर लगेच वाढवून मोठी कमाई केली. गोवा-मुंबई विमान तिकीटाचा दर १४ हजारांपर्यंत गेला. तथापि, स्पाईस जेट विमाने रद्द झाली तरी, प्रवाशांना अन्य विमानांतून त्यांना निश्‍चित स्थळी नेऊन सोडण्याचे आश्‍वासन यावेळी विमान प्राधिकरणांकडून प्रवाशांना देण्यात आल्याने तरीही रात्री उशिरापर्यंत बरेच प्रवासी स्पाईस जेट काऊंटरवर येऊन धिंगाणा घालीत असल्याने पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सागर एकोसकर, सुरेश गांवकर हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून वातावरण बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेत होते.