पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरांची चौकशी करा

0
4

>> काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांची मागणी

पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आपल्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या एका युवतीला आरोग्य खात्यात नोकरी दिल्याचे माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आपण 1200 जणांना नोकरी दिल्याचे सांगताना नोकऱ्यांसाठी कोणीतरी पैशांची मागणीही केली होती असा दावा सिक्वेरा यांनी केला असल्यानेे त्यांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
आपल्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या एका युवतीला वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आपल्या मदतीने आरोग्य खात्यात डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. तसेच मंत्री झाल्यानंतर 1200 जणांना नोकरी दिल्याचे सिक्वेरा यांनी सांगितले आहे. या नोकऱ्यांसाठी कुणीतरी पैसे घेतल्याची माहिती मिळाल्याचे सिक्वेरा यांनी म्हटले असून मंत्री या नात्याने नोकऱ्या मिळवून देणे तसेच कुणी पैसे घेतले होते त्यांची चौकशी न करता भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे या दोन्ही गुन्ह्यांखाली त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जावा आणि त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

त्या 1200 जणांची नावे जाहीर करा

आलेक्स सिक्वेरा यांनी आपण 1200 जणांना नोकरी दिली असून नोकरी मिळालेल्या सदर उमेदवारांकडून काही व्यक्तींनी पैसे घेतल्याची माहिती आपणाला मिळाली होती असे सिक्वेरा यांनी स्वत:च सांगितलेले आहे. सदर पैसे जरी उमेदवारांना त्या व्यक्तींनी परत केले असा दावा त्यांनी आता केला असला तरी सिक्वेरा यांनी त्या नोकरी मिळालेल्या 1200 जणांची नावे जाहीर करावीत. तसेच पैसे घेणारे लोक कोण होते हे उघड करावे, अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.