पर्यटन खात्याच्या होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरणाचा शुभारंभ

0
36

>> पहिल्या वर्षांत ग्रामीण भागात 100 होम स्टेची व्यवस्था होणार; घरमालकाला अर्थसहाय्यही मिळणार; कॅराव्हॅनमुळे कुठेही निवास करता येणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्यटन खात्याच्या होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरणाचा शुभारंभ पर्वरी येथे मंत्रालयात काल करण्यात आला. होम स्टे धोरणांतर्गत पहिल्या वर्षात ग्रामीण भागात 100 होम स्टेची व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यवसाय वाढीसाठी दलालांची मदत घेणाऱ्या व्यावसायिकांचे पर्यटन परवाने रद्द करण्याचा इशारा दिला.
पर्यटन खात्याने होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरणाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्यात ॲडव्हेंचर पर्यटनासाठी मान्यता सक्तीची आहे. कुणालाही बेकायदा ॲडव्हेंचर पर्यटन सुरू करता येणार नाही. पर्यटन खाते ॲडव्हेंचर पर्यटनासाठी धोरण निश्चित करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रात गैरप्रकारांना
थारा नाही : मुख्यमंत्री

पर्यटन क्षेत्रात गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही. राज्याच्या पर्यटनाला दलालांमुळे गालबोट लागत आहे. त्यामुळे दलालांशी संबंधित व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अलीकडेच घडलेल्या पर्यटक मारहाण प्रकरणी त्या दुकानदाराचा मद्य परवाना तातडीने निलंबित केला जाणार आहे. गृह खात्याकडून अबकारी खात्याला कारवाईची सूचना केली जाणार आहे. पर्यटन उद्योगाच्या ठिकाणी दलाल, बाऊन्सर यांना थारा दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सांगे, केपे, काणकोणात
100 होम स्टे : पर्यटनमंत्री

राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. होम स्टे धोरणाखाली पहिल्या वर्षात सांगे, केपे, काणकोण आदी ग्रामीण भागात 100 होमस्टेची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. होम स्टेसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी घरमालकाला आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. या धोरणाखाली घराची एक खोली पर्यटकाला राहण्यासाठी राखीव ठेवली जाणार आहे. त्याठिकाणी पर्यटकाला सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. यावेळी आमदार चंद्रकांत शेट्ये व इतरांची उपस्थिती होती.

कॅराव्हॅन म्हणजे एक चालते-फिरते हॉटेल
कॅराव्हॅन म्हणजे एक चालते-फिरते हॉटेलच. या कॅराव्हॅनमध्ये पर्यटन निवास तसेच एखाद्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सुविधा या ठिकाणी मिळतात. सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ही व्हॅन असते. या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, आरामदायी पलंग, छोटे स्वयंपाकघर, टीव्ही, विजेची सोय, फ्रिज, स्नानगृह, शौचालय अशा सुविधा उपलब्ध असतात. कॅराव्हॅनमुळे पर्यटनादरम्यान निवासासाठी हॉटेलमध्ये थांबण्याची गरज नाही. वाट्टेल तिथे थांबायच. हवे तर गाडीतच स्वयंपाक करायचा. पलंगावर आरामही करायचा, अशा सुविधा मिळतात.