पर्यटक महिला टॅक्सी चालकांचा पर्यटन महामंडळाने फसवणूक केल्याचा आरोप

0
89

पर्यटन विकास महामंडळाने पर्यटक टॅक्सी चालवित असलेल्या दहाही महिला चालकांची फसवणूक केल्याचा आरोप ‘सेंटर फॉर रिसपॉन्सिबिलीटी’ या संघटनेचे फा. फ्रेडी ब्रागांझा व फा. मेवरिक फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत केला.वरील दहा महिला चालकांना दरमहा पंधरा हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आपल्याला विकास महामंडळातर्फे ते सेवेत घेतल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात त्यांना मुंबईस्थित ग्रीन अर्थ ट्रान्सलॉजिस्टीक प्रा. लि. या खाजगी कंपनीने कंत्राटी पध्दतीवर कामावर घेतले व त्यांना १५ हजार रु. वेतन न देता काहींना ६ हजार रुपये वेतन दिले. गेले तीन महिने त्यांना वेतन दिलेले नाही. महिला चालकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. या महिला वाहनचालकांची फसवणूक झाली असून महिला चालक असलेल्या पर्यटक टॅक्सी म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप ब्रागांझा यांनी केला. पत्रकार परिषदेस रिटा वाझ, विनी फर्नांडिस व शामली नाईक या महिला टॅक्सीचालक उपस्थित होत्या. वरील योजनेच्या महामंडळाने थाटात शुभारंभही केला होता.
जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : नीलेश काब्राल
महिला पर्यटक टॅक्सीच्या बाबतीत सीआरटीने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी केला आहे. महिला टॅक्सी चालकांची कोणतीही समस्या असल्यास महामंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तोडगा काढणे शक्य आहे. सुरक्षा व शिस्त हा वरील सेवेचा मंत्र आहे. वरील सेवेसाठी रूजू करून घेताना दिलेल्या पत्रात सर्व नियम नमूद केल्याचे काब्राल यांनी सांगितले. सीआरटीने या प्रश्‍नावर महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महिला टॅक्सी चालकांना प्रशिक्षण काळासाठी दरमहा ६ हजार रुपये वेतन देण्याची तरतूद करण्यात आली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याना दरमहा पंधरा हजार रुपये वेतन मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.