बंदरांचे महामंडळात रूपांतर विरोधात वास्कोत निदर्शने

0
93

देशातील प्रमुख बंदरांचे महामंडळात रुपांतर करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्याने त्याविरोधात गोवा बंदर आणि गोदी कामगार संघटनेतर्फे काल हेडलँड सडा येथील एमपीटीच्या प्रधान कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. दुपारी १२.३० वा. मुरगांव बंदरातील कामगारांतर्फे मोठ्या संख्येने उपस्थिती लावून देशातील प्रमुख बंदरांच्या महामंडळ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात निदर्शने करून विरोध दर्शविला. प्रमुख बंदरांचे महामंडळ करण्यास केंद्र सरकारने पावले उचलल्याने बंदर कामगारामध्ये कमालीची नाराजी पसरल्याचे निदर्शनावेळी दिसून आले. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविताना मुरगाव बंदरातील कामगारांनी हेडलॅण्ड सडा येथील प्रधान कार्यालयासमोर एकत्रित येऊन केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. यावेळी गोवा बंदर आणि गोदी कामगार संघटनेचे अध्यक्ष आगुस्त डिसौझा यांनी देशातील प्रमुख बंदरांचे महामंडळ करण्यासाठी विधेयक केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयातर्फे लोकसभेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार असून त्या विरोधात हा लढा चालूच ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी गोवा बंदर आणि गोदी कामगार संघटनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत गावडे यांचेही भाषण झाले.