Home बातम्या पर्पल महोत्सव हा दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठीचे व्यासपीठ

पर्पल महोत्सव हा दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठीचे व्यासपीठ

0

मंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन

दुसऱ्या दिवशी महोत्सवाला शेकडो लोकांची भेट

पर्पल महोत्सव हा फक्त एक उत्सव नसून हा महोत्सव म्हणजे जगभरातील दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठीचे एक व्यासपीठ असल्याचे काल समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. पर्पल महोत्सवस्थळी मंत्री फळदेसाई दै. नवप्रभाशी बोलत होते. देश-विदेशातून या महोत्सवासाठी आलेल्या दिव्यांगांचा पर्पल महोत्सवातील उत्साह पाहिल्यास त्याचा प्रत्यय येईल, असे ते म्हणाले. मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेले लोक जे-जे काही करू शकतात ते दिव्यांग व्यक्ती पर्पलस्थळी करीत असलेले पाहून आपण भारावून गेल्याचे फळदेसाई म्हणाले. सेरेब्रल पल्लीसारखी व्याधी असलेले दिव्यांग जेव्हा व्हिलचेअरवरून क्रिकेट खेळतात ते पाहून मन भरून येते. एखादा दिव्यांग जेव्हा न घाबरता पॅराग्लायडिंग करण्याचे साहस करतो तेव्हा त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे असे वाटते, असे भावनिक उद्गार यावेळी बोलताना फळदेसाई यांनी काढले.

दोन्ही पाय नसलेले दिव्यांग बास्केटबॉल, बॅडमिंटनसारखे खेळ खेळतात, तेव्हा खूप बरे वाटते. हे सगळे म्हणजे या दिव्यांगांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण व सशक्तीकरण असल्याचे आपण मानतो, असे फळदेसाई यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

विविध स्टॉल्स

पर्पल महोत्सवात शेकडो स्टॉल्स असून त्या स्टॉल्सवर दिव्यांग लोकांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी आवश्यक असलेली अवजारे व यंत्रे आहेत. त्यात कृत्रिम पाय, हात, वॉकर्स, संवाद साधण्यासाठीची उपकरणे, स्मार्ट ग्लासेस, स्क्रीन रिडर्स तसेच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आदींचा समावेश असल्याची माहिती मंत्री श्री. फळदेसाई यांनी दिली.

पर्पल महोत्सवस्थळी सर्वांत पहिले स्टॉल आहे ते ‘स्वयंम हेल्थ इको सिस्टम’चे. तेथे दिव्यांगांसाठीच्या आरोग्यविषयक वेगवेगळ्या अशा 140 चाचण्या करता येतात. त्यात रक्तदाबापासून मूत्र व रक्त गट तपासणी, तसेच हृदयविषयक तपासण्यासह अन्य कित्येक तपासण्याचा समावेश असल्याचे फळदेसाई म्हणाले. ही यंत्रणा आता सरकार राज्यात उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही पर्पल महोत्सवानिमित्त बोलताना फळदेसाई यांनी दिली.
काल महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महोत्सवस्थळी शेकडोच्या संख्येने दिव्यांग, प्रतिनिधी व अन्य लोकांनी भेट दिली.

पर्पल महोत्सवाला महामंडलेश्वर स्वामी

आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवानिमित्त खास हृषिकेश येथून गोव्यात आलेल्या महामंडलेश्वर स्वामींनी काल पर्पल स्थळाला भेट देऊन मंत्री फळदेसाई यांच्याशी संवाद साधला. आपण हृषिकेश येथे दिव्यांगांसाठी काम करीत असून अशा प्रकारचा पर्पल महोत्सव आपणाला हृषिकेश येथे आयेजित करायला आवडेल. त्यासाठी आपण मला मार्गदर्शन करावे, अशी विनंती महामंडलेश्वर स्वामीनी सुभाष फळदेसाई यांना केली असता फळदेसाई यांनी मार्गदर्शन करायला आपणाला आवडेल, असे यावेळी महामंडलेश्वर स्वामी यांना सांगितले. गोव्यातील भव्यदिव्य असा पर्पल महोत्सव पाहून आपण भारावून गेल्याचे यावेळी महामंडलेश्वर स्वामीनी फळदेसाई यांना सांगितले. या पर्पल महोत्सवासाठी गोव्याबाहेरून आणखीही काही आध्यात्मिक गुरू येणार असल्याची माहिती यावेळी फळदेसाई यांनी दिली.