पद्मश्री विनायक खेडेकर व कांता गावडे यांना डॉ. कोमल कोठारी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

0
223

लोकसंस्कृतीचे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर व लोककलाकार कांता गावडे यांना लोककलेतील योगदानासाठी राजस्थानचे राज्यपाल तथा पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपुरचे पदसिद्ध अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या हस्ते डॉ. कोमल कोठारी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजभवन, उदयपूर येथे हा सोहळा संंपन्न झाला.

यावेळी राज्यपाल श्री. मिश्रा यांच्या हस्ते विनायक खेडेकर व कांता गावडे यांना डॉ. कोमल कोठारी जीवन गौरव पुरस्कार रजतपट्टीका व शाल प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्काराची रु. २,५१,००/- रक्कम दोन्ही पुरस्कार विजेत्यांना विभागून देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल श्री. मिश्रा यांनी समाजामध्ये लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्यावर भर दिला. लोककलाकारांना सादरीकरण करण्यास जास्तीत जास्त संधी मिळाव्यात तसेच पारंपरिक लोककलाप्रकारांचे संशोधन, संकलन व दस्तावेज स्वरूपात संवर्धन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत डॉ. कोमल कोठारी यांनी राजस्थानी लोककला, लोकसंगीत व लोकनाट्य तसेच लोकगीते इत्यादीपर केलेल्या संशोधन, जतन व संवर्धनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांची स्मृती व योगदान चिरंतन राहावे या हेतूने या पुरस्काराची योजना २०१६ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. हा पुरस्कार पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अखत्यारित येणार्‍या राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यांत तसेच दादरा व नगर हवेली या संघप्रदेशातील लोककलाकारांना देण्यात येतो. यंदा प्रथमच या पुरस्काराचे मानकरी म्हणून दोन गोमंतकीय लोककलाकारांना मान मिळाला आहे.