पत्रादेवी-झुआरी पूल महामार्गाची गडकरींहस्ते २२ रोजी पायाभरणी

0
111

>> मुख्यमंत्री पार्सेकरांची माहिती

 

पत्रादेवी ते नवा झुवारी पूल या दरम्यान द्रुतगती महामार्गासाठी केंद्र सरकारकडून गोवा सरकारला २ हजार कोटी रु. एवढा निधी मिळणार आहे. या सहापदरी महामार्गामुळे मोप येथून काणकोणला जलदगतीने पोहोचणे शक्य होणार आहे. या महामार्गाची पायाभरणी गुरूवार दि. २२ रोजी केंद्रीय भूपृष्ठ व्यवहारमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल गोवा मुक्ती दिनानिमित्त पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गोवा मुक्तदिनानिमित्त काल येथे आयोजित कार्यक्रमात गोमंतकीयांना मार्गदर्शन केल्यावर पत्रकारांशी बोलताना पार्सेकर यांनी वरील माहिती दिली. गडकरी यांच्या हस्ते येत्या दि. २२ रोजी या द्रुतगती महामार्गाची तसेच मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या जेटीची पायाभरणी होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पेट्रोलदरात वाढ नाही
गोव्यातील भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यात पेट्रोलचे दर खाली आणले. त्यासाठी पेट्रोलवरील व्हॅटही खाली आणला. त्यामुळे पेट्रोल लिटरमागे ६० रु. वर गेले नाही. आताही सरकार पेट्रोलचे दर लिटरमागे ६० रु. पेक्षा वर जाऊ देणार नसल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
गडकरी बिगर भाजप
नेत्यांची भेट घेणार नाहीत
दरम्यान, दि. २२ रोजी गोव्यात येणार असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे यावेळी गोव्यातील भाजप सोडून अन्य नेत्यांची भेट घेणार नसल्याचे पार्सेकर यांनी मगो पक्षाचा उल्लेख न करता बोलताना सांगितले.