पत्नीचा मृतदेह १२ किलोमीटर खांद्यावरून नेण्याची पतीवर वेळ!

0
81

>> ओडिशा प्रशासनाचा ढिम्म कारभार

 

मरण आल्यावर माणूस त्याच्या यातनेतून मुक्त होतो असे म्हणतात. पण मेल्यानंतरही यातनेच्या पीडेतून मृतदेहाची सुटका न झाल्याचा प्रत्यय ओडीशातील कलाहंडी गावात आला. तेथील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे एका पतीला व बारा वर्षांच्या मुलीला आपल्या आईचा मृतदेह खांद्यावरून तब्बल १२ किलोमीटरपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली. मरणानंतर पुढची यात्रा सुखकारक होवो, अशी श्रद्धा ठेवणार्‍या देशातले हे क्लेशकारक सत्य आहे. दाना माजी यांच्या पत्नीचे कर्करोगाने बुधवारी सकाळी सरकारी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मृतदेह घरापर्यंत नेण्याची व्यवस्था करण्याची विनंती रुग्णालयातील सगळ्यांना करून पाहिली. पण त्यांना मदत करण्यास कोणीच पुढे सरसावले नाहीत. शेवटी हतबल होऊन त्यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून खांद्यावर घेऊन रुग्णालय ते घर असे ६० किलोमीटर अंतर पायी चालत जाण्याचा निर्णय घेत घराची वाट धरली. १२ किलोमीटर गेल्यानंतर पुढचे ४८ किलोमीटरपर्यंत शववाहिकेची सोय करण्यात आली. पण तोपर्यंत हे विदारक चित्र जगासमोर आले होते. या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकार्‍यांनी दाना शववाहिकेची वाट बघण्यासाठी थांबले नसल्याचे सांगितले. तर दाना यांनी सगळ्यांना विनंती करूनही कोणीही लक्ष दिले नसल्याचा आरोप केला आहे. सरकारी इस्पितळात मृत्यू झाल्यास ओडीशा सरकारने मृतदेह नेण्यासाठी नि:शुल्क शववाहिकेची सोय केली आहे. परंतु अनेकदा मृतदेह खांद्यावर वाहून नेण्याचे प्रकार घडले आहेत.