पती-पत्नीतील वादातून मुलाचा खून

0
35

>> पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड; संशयित सूचना सेठ हिची 6 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

>> 4 वर्षीय मुलाच्या खुनाचे कारण मन हेलावणारे; घटस्फोटानंतर मुलाचा ताबा गमावण्याची मातेला भीती

सिकेरी-कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये आपल्याच 4 वर्षीय मुलाचा खून करून नंतर मातेने चित्रदुर्ग-कर्नाटक येथे पलायन केल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले होते. या प्रकरणी आई सूचना सेठ (39, रा. बंगळुरू) हिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सूचना सेठ ही बंगळुरूतील एका ‘एआय’ कंपनीची सीईओ आहे. तिने आपल्याच मुलाचा खून का केला, याचा उलगडा काल झाला. पती-पत्नीतील संबंध बिघडल्याने आपल्याच 4 वर्षांच्या मुलाचा सूचना सेठ हिने खून केल्याचे पोलीस तपासात प्रथमदर्शनी समोर आले, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. संशयित सूचना सेठ आणि तिचा पती यांचा घटस्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे; मात्र या घटस्फोटासंबंधी न्यायालयीन निवाड्याची कागदपत्रे पोलिसांना अजूनपर्यंत मिळालेली नाहीत. घटस्फोटामुळे मुलाचा ताबा वडिलांकडे जाईल, या भीतीने सूचना वैफल्यग्रस्त बनली होती. याच वैफल्यग्रस्त अवस्थेतून तिने मुलाची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सदर मुलाचे वडील काल रात्री उशिरा विदेशातून कर्नाटकात परतले आणि मुलाचे शव ठेवलेल्या इस्पितळात ते दाखल झाले.

सूचना सेठ ही बंगळुरूमधील एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे. तिने स्वत:च हा स्टार्टअप सुरू केला होता. ती मूळ पश्चिम बंगालची असून, सध्या बंगळुरूमध्ये राहते. तिचा पती केरळचा असून, तो सध्या जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे. 2010 साली दोघांचे लग्न झाले होते. 2019 साली मुलाचा जन्म झाला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये बिनसले आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. 2020 साली परिस्थिती हाताबाहेर गेल्याने दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. पुढे सूचना हिने आपले सगळे लक्ष आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपकडे वळवले. या दरम्यान त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरूच होती; पण मुलाचा ताबा कोणाकडे असावा, हा प्रश्न होताच. यावर तात्पुरता तोडगा म्हणून न्यायालयाने दर रविवारी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात यावा, अशी अट ठेवली होती. मात्र मुलाचा ताबा पित्याकडे जाणार, या भीतीने कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिने मुलासकट गोवा गाठला होता. रविवारी पतीने फोन केला असता त्यांच्यात या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. शेवटी मुलाच्या चिंतेने वैफल्यग्रस्त होत तिने टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे.

सूचनाच्या एका हातावर जखम
सूचना सेठ हिच्या एका हातावर जखम आढळून आली आहे. आपल्या मुलाचा खून केल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असण्याची दाट शक्यता आहे. सूचना सेठ हिची सखोल चौकशी केल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळू शकते. अजूनपर्यंत पोलिसाने सूचना सेठ हिची पोलीस कोठडीत चौकशी केलेली नाही, असेही निधीन वाल्सन यांनी सांगितले.

हॉटेल कर्मचारी, टॅक्सीचालकाची सतर्कता
सिकेरी येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि टूरिस्ट टॅक्सीचालकाच्या प्रसंगावधाने 4 वर्षीय मुलाच्या खूनाचा त्वरित छडा लावण्यात यश आले, असे निधीन वाल्सन म्हणाले.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
भारतीय दंड संहिता आणि गोवा बाल कायदा कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत पोलिसांनी सूचनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण चौकशी केल्यानंतरच हत्येमागील हेतू स्पष्ट होईल, असे निधीन वाल्सन यांनी सांगितले.

गुदमरल्याने मुलाचा मृत्यू : डॉ. कुमार
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील सरकारी इस्पितळात सदर मुलाच्या मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली. त्यात उशी किंवा तत्सम वस्तू वापरून नाक दाबल्याने गुदमरून मुलाचा मृत्यू झाला. त्याचा चेहरा आणि छाती सूजली आहे. नाकातूनही रक्तस्त्राव झाल्याचे डॉ. कुमार नाईक यांनी शवविच्छेदन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

100 ‘ब्रिलियंट’ महिलांत सूचनाचे नाव
सूचना सेठ हिने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) स्टार्टअप सुरू केला होता. 2021 साली तिला ‘100 ब्रिलियंट वुमन इन एआय एथिक्स लिस्ट 2021′ च्या सन्मानाने गौरविण्यात आले होते.

सहा दिवसांची पोलीस कोठडी
कळंगुट पोलिसांनी संशयित सूचना सेठ हिला म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमोर काल हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सूचना ही मानसिक तणावाखाली असल्याची माहिती तिच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

खून अन्‌‍ पलायनाचा घटनाक्रम…

सूचना सेठ शनिवारी आली गोव्यात
शनिवार 6 जानेवारीला सूचना सेठ ही आपल्या मुलासह गोव्यात आली. सिकेरी कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. सोमवार 8 रोजी सकाळी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून तिने आपल्याला तातडीने बंगलोर येथे जायचे आहे. त्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करण्याची सूचना केली.

टॅक्सीसाठीच आग्रह
हॉटेल कर्मचाऱ्याने विमानाने जाण्याबाबत विचारपूस केली. त्यावेळी तिने टॅक्सीच हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी एका टॅक्सीची व्यवस्था केली. साधारणपणे सकाळी 8 च्या सुमारास सूचना सेठ टॅक्सीने बंगळुरूला रवाना झाली.

खोलीत दिसले रक्ताचे डाग
यानंतर सकाळी 10 वाजता हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सूचना ज्या खोलीत थांबली होती, त्या खोलीत रक्ताचे डाग दिसून आले. त्यांनी तातडीने कळंगुट पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निरीक्षक परेश नाईक यांनी त्वरित हॉटेलमध्ये धाव घेऊन पाहणी केली.

सूचनाशी संपर्क साधण्यात अपयश
रक्ताचे डाग दिसून आल्याने हॉटेलच्या सदर खोलीत जी महिला मुलासोबत राहत होती, तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

टॅक्सीचालकामार्फत सूचनाशी संपर्क
यानंतर, ज्या टॅक्सीने सूचना बंगळुरूला रवाना झाली होती, त्या टॅक्सीचालकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडे तिच्यासोबत असलेल्या मुलाबाबत चौकशी केली. त्यावेळी तिने मुलाला मडगाव येथे नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांना दिली खोटी माहिती
पोलिसांनी मडगावच्या नातेवाईकाचा पत्ता घेतला. त्यानंतर, कळंगुट पोलिसांनी फातोर्डा पोलिसांशी संपर्क साधून त्या मुलाबाबत चौकशी करण्याची सूचना केली; मात्र त्या महिलेला दिलेला पत्ता बोगस असल्याचे आढळून आले.

टॅक्सीचालकाला केले सतर्क
यानंतर कळंगुट पोलिसांनी पुन्हा एकदा टॅक्सीचालकाशी संपर्क साधून टॅक्सी जवळच्या पोलीस स्थानकात नेण्याची सूचना केली. त्यावेळी टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये पोहोचली होती.

टॅक्सी नेली पोलीस स्थानकात
कळंगुट पोलिसांनी चित्रदुर्गच्या पोलीस अधीक्षकांशी त्वरित संपर्क साधून टॅक्सीची तपासणी करण्याची विनंती करण्यात आली. टॅक्सीचालकाने आयमंगला पोलीस स्थानकात टॅक्सी नेऊन थांबवली, तेथील पोलिसांनी टॅक्सीतील सामानाची तपासणी केली.

अन्‌‍ मुलाचा मृतदेह सापडला
आयमंगला पोलिसांनी सूचना सेठच्या सामानाची तपासणी केली असता, एका बॅगेत तिच्या चार वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर, कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस पथक चित्रदुर्गाला रवाना झाले. त्याठिकाणी मुलाचा मृतदेह सरकारी इस्पितळातील शवागारात ठेवला. तसेच, सूचनाला ताब्यात घेऊन मंगळवारी दुपारी पोलीस पथक गोव्यात परतले, अशी माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.