पतीकडून पत्नीचा सुर्‍याने भोसकून खून

0
82

फातर्प्यातील अमानुष घटना
कट्टा फातर्पा येथे स्वत:च्या घरांत जयेश नाईक (३६) याने काल सकाळी आपली पत्नी जीया जयेश नाईक (३४) हिचा पोटांत सुरा खुपसून निर्घृणपणे खून केला. खुनानंतर जयेश मोटर सायकल घेऊन पसार झाला. तो अद्याप सापडलेला नाही. बर्‍याच काळापासून चालू असलेल्या भांडणातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनासाठी वापरलेले सुरे घरांतच पोलिसांना सापडले. गेल्या दहा वर्षांपूर्वी अजय याचे लग्न झाले होते. त्यांना अनुक्रमे ५ व ३ अशा वयाची मुलगा व मुलगी आहे. काल सकाळी दोघांही मुलांना तो बाळ्ळी येथील के. जी.च्या स्कुलमध्ये पोहचवून आला व येताना बाजारांतून एक सुरा घेऊन आला त्याला पाहिलेल्या नागरिकाने सांगितले. जयेश नाईक हा आखातात काही काळ नोकरी करत होता. नंतर तो गावी परतला होता. गेले वर्षभर घरीच होता. गेल्या दोन तीन वर्षांपासून उभयतांमध्ये वारंवार खटके उडत असत. शिव्या देणे, मारपीट हे चालूच होते, असे सांगण्यात आले. जीया हिचा भाऊ वैभव नाईक हा शिरवडे-खारेबांध येथे राहातो. तिने आमच्याकडे पतीविरुध्द वारंवार तक्रार केली होती, असे तिची नणंद सौ. रश्मी नाईक हिने सांगितले. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण उपयोग झाला नाही. शेवटी घटस्फोट घेण्याचाही सल्ला आम्ही दिला. भांडणानंतर ती मुलांना घेऊन आमच्याकडे खारेबांध येथे येत होती. खुनावेळी जीया हिने मोठ्यामोठ्याने आरडाओरड केल्याने लोक धांवत आले व कुंकळ्ळी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेला. तेथे डॉक्टरांनी जीया नाईक मृत असल्याचे घोषित केले.
दुपारपर्यंत मुले शाळेतच होती. त्यांना आणण्यासाठी कोणीच पोहोचले नाही. शेवटी नातेवाईकांनी त्यांना आपल्या घरी नेले. खुनानंतर होंडा स्प्लेंडर घेवून जयेश पळाला. गेल्या काही दिवसामागे जीया हिने पतीच्या छळाविरोधात कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार नोंदविली होती.