पणजी पोटनिवडणुकीतील उमेदवारांबाबत अजून अस्पष्टताच

0
111

पणजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून पोट निवडणूक लढविण्यासाठी वेगवेगळ्या नावांवर चर्चा होत असली तरी सिध्दार्थ कुंकळकर यांचे नांव जवळजवळ निश्‍चित झाल्याचे कळते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपचा उमेदवार लोकांमध्ये मिसळणारा असेल असे याआधी एकदा म्हटले होते. पक्षाने कोणताही उमेदवार निवडला तरी त्याच्यासाठी सर्वांनी काम करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पक्षाला पोटनिवडणूक जिंकणे सहज शक्य होईल, असे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.बाबूशच्या भूमिकेकडे लक्ष
या पोटनिवडणुकीसंदर्भात सांताक्रूझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. ते कोणती भूमिका घेतील हे पुढील दोन आठवड्यात स्पष्ट होऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आपण निवडणूक लढविणार असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी जाहीर केले आहे. परंतु कॉंग्रेसने याबाबतीत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीही उमेदवार निवडण्यासाठी पक्षातर्फे योग्य प्रक्रिया होणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.
भाजप उमेदवार येत्या दोन आठवड्यात : पर्रीकर
पणजी मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत सल्लामसलत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पुढील दोन आठवड्यात उमेदवार जाहीर करणे शक्य होईल. पक्ष ज्या उमेदवाराला निवडणूक लढविण्याचा आदेश देतील त्यालाच निवडणूक लढवावी लागेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.
प्रदेश निवडणूक समितीने उमेदवार निवडल्यानंतर केंद्रीय संसदीय निवडणूक मंडळाची मान्यता घेतली जाईल व त्यानंतर उमेदवाराचे नाव अधिकृतरित्या जाहीर होईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. पणजी मतादरसंघासाठी उमेदवार निवडणे कठीण नसल्याचेही ते म्हणाले.